कर्णधार रोहित शर्मा यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत एक मोठे विधान करत म्हटले की, “या सामन्याची तुलना कोणत्याही इतर सामन्याशी करता येत नाही. हा एक सामना नसतो, तो एक अनुभव असतो.”
टी२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तान सामन्याची आठवण सांगताना रोहित म्हणाले की, “सामन्याच्या दोन दिवस आधीपासूनच आम्हाला हॉटेलमध्येच राहण्यास सांगितले गेले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्हाला बाहेर जाण्यास मज्जाव होता. वातावरणच वेगळं होतं – हॉटेलमध्ये चाहत्यांचा, प्रसारमाध्यमांचा गराडा होता. आम्ही जेवण ऑर्डर करत होतो आणि सभोवताली चालण्याससुद्धा जागा नव्हती.”
सामन्यादिवशीचे वातावरण सणासारखे असल्याचे सांगताना रोहित पुढे म्हणाले, “जसेच आम्ही स्टेडियमकडे निघालो, तिथे भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांचा जल्लोष सुरू होता. नाच, गाणी, आवाज… सर्व काही वेगळ्या उंचीवर होतं. मी अनेक भारत-पाकिस्तान सामने खेळलो आहे, पण या सामन्याच्या आधीचा उत्साह काही औरच होता.”
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ११९ धावा केल्या होत्या. त्यामध्ये ऋषभ पंतने ४२ धावांची निर्णायक खेळी केली. याचा उल्लेख करत रोहित म्हणाले, “पंतने आपल्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करताना आम्हाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले. त्या खेळपट्टीवर ४२ धावा म्हणजे ७० धावांच्या समतुल्य होत्या.”
भारताने या सामन्यात केवळ ६ धावांनी विजय मिळवला. बुमराहने ३ बळी घेत सामन्याचे चित्रच बदलले. “बुमराह आणि अर्शदीप यांचा वापर योग्य वेळी करणं महत्त्वाचं होतं. त्यांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला रोखलं,” असेही रोहितने सांगितले.
“सामन्यापूर्वीचा जोश, मैदानाबाहेरील वातावरण, प्रत्येक क्षणात असणारा ताण… हे सगळं अनुभवणं म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना,” असा भावनिक निष्कर्ष रोहित शर्माने नोंदवला.
