ऑनलाइन ज्ञानकोश विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या ‘आक्षेपार्ह’ मजकुरावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधून हा मजकुर काढून टाकण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी विकिपीडियाला नोटीस बजावली असून मजकूर काढून टाकला नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खान याने ट्वीटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याची बाब समोर आली होती. विकीपीडियाचा आधार घेत कमाल खानने हे ट्वीट केले होते. मात्र, कमाल खानच्या ट्वीटनंतर सर्वचं स्तरावरून संताप व्यक्त केला आणि टीकेची झोड उठवण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच यासंदर्भात विकीपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांना आदेश दिले.
विकिपीडियाला लिहिलेल्या पत्रात, महाराष्ट्र सायबर विभागाने म्हटले आहे की, संबंधित मजकूर जातीय द्वेष भडकवत आहे, कारण छत्रपती संभाजी महाराज भारतात अत्यंत आदरणीय आहेत. ही चुकीची माहिती त्यांच्या अनुयायांमध्ये अशांतता निर्माण करत आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि वेळेवर लक्ष न दिल्यास त्याचा संभाव्य परिणाम लक्षात घेता, संबंधित कायदे आणि नियमांद्वारे या कार्यालयाला मिळालेल्या अधिकारांनुसार, तुम्हाला आक्षेपार्ह सामग्री काढून टाकण्याचे आणि भविष्यात ती पुन्हा अपलोड करण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, असे पत्रात म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, सरकार ऐतिहासिक तथ्यांचे कोणतेही विकृतीकरण सहन करणार नाही, विकिपीडियासारख्या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवरील चुकीची माहिती अस्वीकार्य आहे यावर भर दिला. “मी महाराष्ट्र सायबर सेलच्या महानिरीक्षकांना विकिपीडिया अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास आणि छत्रपती संभाजी महाराजांविरुद्धचा आक्षेपार्ह विषय काढून टाकण्यास सांगितले आहे. ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केला जातो अशा प्रकारचे लेखन आम्ही सहन करणार नाही. मी अधिकाऱ्यांना आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे एक पर्व म्हणजेचं मराठ्यांचं आरमार!
सिसोदियांनी शासकीय वस्तू चोरल्या
अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!
विकिपीडिया, एक सार्वजनिकरित्या संपादित करण्यायोग्य ऑनलाइन विश्वकोश, भारतापासून स्वतंत्रपणे कार्यरत आहे. अनेकजण त्यात लेख योगदान देतात, संपादित करतात आणि त्यांची देखभाल करतात. पण, तथ्यांचे असे विकृतीकरण रोखण्यासाठी आम्ही त्यांना नियम लागू करण्याची विनंती करू शकतो, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.