गिरगाव चौपाटी येथील सेल्फी पॉईंटवर बंदोबस्तावर असलेले पोलीस अंमलदार शिवाजी उगले यांच्यावर एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात पोलीस अंमलदार उगले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारा मनोरुग्णा असून त्याच्याविरुद्ध गांवदेवी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दक्षिण मुंबईतील गांवदेवी पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलिस अंमलदार शिवाजी उगले यांना गुरुवारी गिरगाव चौपाटी या ठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंट येथे कर्तव्य देण्यात आले होते. उगले हे सायंकाळी आपले कर्तव्य बजावत असताना पाठीमागून एक इसम हातात भलामोठा दगड घेऊन आला आणि काही कळण्याच्या आत त्याने उगले यांच्या डोक्यात आणि पाठीत दगडाने प्रहार करण्यास सुरुवात केली, या प्रकारामुळे सेल्फी पॉईंटवर आलेल्या पर्यटकामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
सेल्फी पॉईंटच्या शेजारीच असलेल्या पोलीस बिट मधील पोलीस धावत सेल्फी पॉईंटवर आले व त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून उगले यांची सुटका केली, हल्ल्यात गंभीर जखमी झालेले उगले यांना तात्काळ वॉकहार्ड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
हे ही वाचा :
लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार कसे जोडले गेले?
युनूस सरकार विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा!
हिंदू मुलीचा लग्नास नकार, मोहम्मदने तरुणीसह कुटुंबाला पेटवले!
अलास्कातील विमान रडारवरून अचानक गायब, १० बेपत्ता
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता हल्लेखोर हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. गांवदेवी पोलिसांनी या मनोरुग्णावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.