पश्चिम बंगालमध्ये २०२४ साली आर.जी. कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयात एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीला रुग्णालयाच्या आवारात ओढून नेण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असलेली पीडित महिला राजधानी कोलकातापासून १७० किमी अंतरावर असलेल्या पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या दुर्गापूरमधील शोभापूरजवळील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेत आहे. माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही विद्यार्थिनी तिच्या एका मित्रासह कॅम्पसमधून बाहेर पडली. कॅम्पसच्या गेटजवळ एका पुरूषाने तिला रुग्णालयाच्या मागे असलेल्या एका निर्जन ठिकाणी ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांची आणि महिलेसोबत आलेल्या मित्रासह इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू केली आहे. वैद्यकीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या मित्राने त्यांना या घटनेची माहिती दिली. तिथे पोहोचलो तेव्हा माझ्या मुलीची प्रकृती गंभीर होती आणि रुग्णालय प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांची मुलगी तिचा प्रियकर वासिफ अली याने तिला भेटायला बोलावल्यानंतर कॅम्पसबाहेर ‘फुचक’ (पाणीपुरी) खायला गेली होती.
हे ही वाचा :
“एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांचे उड्डाण बंद करा”
“भारत अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी तळ म्हणून करतोय” पाक लेफ्टनंट जनरल बरळले
मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजस्थानातील एकाला अटक!
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की त्यांनी तिला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न दाखवून कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता. आता मुलीला न्याय हवा आहे जेणेकरून अशा घटना इतर कोणत्याही मुलीसोबत घडू नयेत. कॅम्पसमध्ये योग्य सुरक्षा नाही, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.







