दिवाळीच्या तोंडावर मुंबईत दरोड्यांच्या आणि लुटमारीच्या घटना सलग घडू लागल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवडी परिसरात भरदिवसा डिलिव्हरी बॉयकडून सव्वा दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्यानंतर, बुधवारी सकाळी घाटकोपरमध्ये आणखी एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली. अमृतनगर येथील ‘दर्शन ज्वेलर्स’ दुकानावर दोन मोटारसायकलस्वारांनी शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकत ज्वेलर्स मालकावर हल्ला केला.
ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दोघांनी चेहऱ्यावर मास्क घातलेले होते. त्यापैकी एकाने चाकू बाहेर काढत दुकान मालक दर्शन मेटकरी यांना धमकावले. दर्शन यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. दुसऱ्या दरोडेखोराने दरम्यान रिव्हॉल्व्हर दाखवत दुकानातील ३० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून दोघेही मोटारसायकलवरून पसार झाले.
या हल्ल्यात दर्शन मेटकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर घाटकोपर पोलिस आणि गुन्हे शाखा परिमंडळ-७ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचा पंचनामा करून परिसरातील आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा :
समुद्र शक्ती २०२५ : भारत-इंडोनेशिया नौदलाचा युद्धाभ्यास
संभलमध्ये सार्वजनिक उद्यानाच्या जमिनीवर बांधलेल्या मशीदीवर बुलडोझर कारवाई
महाभारतातील कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ७ अंतर्गत सहा पथके तसेच मुंबई गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सलग दोन दिवसांत घडलेल्या या दोन मोठ्या लुटमारीच्या घटनांनी मुंबई पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.







