कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर केलेल्या टीकेवर भाजप खासदार संबित पात्रा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “काँग्रेस नेहमी पाकिस्तानसारखी भाषा बोलते आणि हिंदूंच्या हितासाठी विचार करणाऱ्या कोणत्याही संस्थेचे अस्तित्व त्यांना सहन होत नाही.”
एएनआयशी बोलताना पात्रा म्हणाले, “प्रियांक खर्गे आरएसएस विरोधात जे बोलले आहेत, ते काही नवीन नाही. आरएसएसविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या विषारी भाषेला आम्ही सहन करतो. पण सत्य सांगणे आवश्यक आहे.”
सरकारी मालमत्तेच्या वापरावरून आणि संघाला ‘अवैधानिक संस्था’ म्हणण्यावर प्रत्युत्तर देताना पात्रा म्हणाले, “प्रियांक खर्गेंना आठवण करून द्यायला हवे की, काँग्रेसच्या काळात सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समिती (NAC) पंतप्रधानांच्या नाकाखालून फायली ओढायची. तेव्हाही ती एक घटनाबाह्य संस्था होती.”
भाजप नेत्याने असा दावा केला की काँग्रेस सदस्य “हिंदू धर्म आणि सनातन धर्माचा द्वेष करतात”. ते म्हणाले, “त्या काळात भारत सरकारचे निर्णय हे कोणत्याही अधिकृत संस्थांनी नव्हे, तर NGO आणि घटनाबाह्य संस्था घेत होत्या. ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना फक्त संघविरोधापुरती मर्यादित नाही, तर ती हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीविरोधातील काँग्रेसच्या खोलवर असलेल्या द्वेषाचे प्रतीक आहे.”
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जुन्या विधानाचा उल्लेख करत, पात्रा म्हणाले, “प्रियांक खर्गे यांचे वडील आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका भाषणात स्पष्टपणे सांगितले होते की, ‘आपल्याला सनातन धर्म नष्ट करायचा आहे.’ हीच ती मानसिकता आहे, जिथून भगवा दहशतवादासारख्या संज्ञा जन्माला आल्या.”
हे ही वाचा :
मुंबईत दरोड्यांचे सत्र सुरु; शिवडीच्या घटनेनंतर घाटकोपरमध्ये ज्वेलर्सवर शस्त्रधारी दरोडा!
समुद्र शक्ती २०२५ : भारत-इंडोनेशिया नौदलाचा युद्धाभ्यास
महाभारतातील कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन
काँग्रेसला खुलं आव्हान देताना पात्रा म्हणाले, “जर प्रियांक खर्गे आणि काँग्रेसमध्ये खरेच धमक असेल, तर त्यांनी कर्नाटकमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात असेच विधान करावे. पण तसे न करता काँग्रेस त्यांच्याशी राजकीय आघाडी करत निवडणुका लढवते.” पात्रा पुढे म्हणाले, “‘हिंदू’ म्हणजे या मातीतला सुगंध, या भूमीचं सार. जो कोणी या भूमीवर प्रेम करतो, त्याच्यावर काँग्रेसला द्वेष आहे. कधीकधी असे वाटते की काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे.”







