मणिपूरमध्ये हिंसाचार शमला असून अद्याप सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा दल आणि पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. या कारवाई दरम्यान काही प्रतिबंधित संघटनांच्या सक्रीय सदस्यांना अटक करण्यात येत आहे तर, शस्त्रसाठा जप्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षा दलाला मणिपूरमध्ये मोठे यश मिळाले आहे.
मणिपूर पोलिस आणि सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे, स्फोटके आणि वाहने जप्त केली आहेत. कारवाईत पोलिसांनी केसीपीच्या (सिटी मैइतई) पाच सक्रिय सदस्यांना अटक केली आहे. सुरक्षा दलांनी केसीपी (एमसी) प्रोग्रेसिव्हचा एक सदस्य आणि प्रेपाकच्या (प्रो) सक्रिय सदस्याला अटक केली आहे.
इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हिंगांग पोलिस ठाणे अंतर्गत मंत्रीपुखरी ठाकूरबारी येथून केसीपीच्या (सिटी मैइतई) पाच सक्रिय सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. लैशराम बुलू सिंग (वय २६ वर्षे), आरके नेल्सन (वय १९ वर्षे), लैरेलरकपम थोइबा सिंग (वय २७ वर्षे), कांगुजाम जेबाश सिंग (वय २८ वर्षे) आणि बोयामायुम जबीरखान (वय १९ वर्षे) अशी या अटक करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक ९ एमएम पिस्तूल (११ जिवंत काडतुसांसह), दोन ३६ एचई हँडग्रेनेड, तीन मोबाईल फोन, एक स्लिंग बॅग, ५,७०० रुपये रोख आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा..
महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!
अतुल भातखळकरांनी घेतली त्यांच्या १०१ वर्षांच्या आजीची सदिच्छा भेट!
जात सर्वेक्षण करून काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारला धोंडा!
मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर!
दुसऱ्या एका कारवाईत, सुरक्षा दलांनी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंजामेई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंजामेई थोइबाम लाईकाई येथून केसीपी (एमसी) प्रोग्रेसिव्हचा सक्रिय केडर खांगेम्बम बिपिन सिंग (वय ५० वर्षे) याला अटक केली आहे. याचा सहभाग खंडणी प्रकरणात असून त्याच्याकडून एक दुचाकी, एक मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, पोलिसांनी थौबल जिल्ह्यातील याईरीपोक पोलिस ठाणे परिसरातील याईरीपोक मार्केटमधून प्रेपाकचा (प्रो) सक्रिय सदस्य सिनाम याईमा मेतेई उर्फ चिंगाकपा (वय ४५ वर्षे) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.