जावयाने सासूला टेम्पोत कोंबून मारहाण करून जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना मुलुंड पूर्व येथे घडली, या जाळपोळीत सासूसह जावयाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी नवघर पोलिसांनी मृत जावयाविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सासूने पत्नीचे कान भरल्यामुळे पत्नी आपल्यापासून मागील काही वर्षांपासून वेगळी राहत असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
कृष्णा दाजी आष्टणकर (५६) असे जावयाचे नाव असून बाबी दाजी उसरे (७२) असे मृत सासूचे नाव आहे. मुलुंड पूर्व येथील नाणेपाडा येथे बाबी दाजी उसरे विवाहित मुलगी आणि २२ वर्षाच्या नातूसह राहत होत्या. आरोपी मृत कृष्णा दाजी आष्टणकर हे बाबी उसरे यांचे जावई होते. कृष्णा हे पत्नी आणि दोन मुलासह मुलुंड पूर्व येथेच राहण्यास होते.
टेम्पो चालक असणारा कृष्णा याची पत्नी ७ ते ८ वर्षापूर्वीच मुलांसह माहेरी राहण्यास होती. पत्नी सोडून गेल्यामुळे कृष्णा हा एकटा पडला होता, त्याला दारूचे व्यसन होते आणि तो टेम्पोतच राहण्यास होता. सासूने आपला संसार उध्वस्त केला या संशयावरून तो नेहमी सासूसोबत भांडत होता.
मागील ५ ते ६ महिन्यापासून कृष्णा याची पत्नी रुग्ण सांभाळण्यासाठी बोरिवली येथे गेली होती व त्याच ठिकाणी राहण्यास होती. कृष्णाचा एक मुलगा २२ वर्षाचा असून मुलगी २३ वर्षाची आहे. तिचा विवाह झाला आहे.
हे ही वाचा:
प्रयागराजमध्ये भरला ‘चहाचा महाकुंभ’
महाकुंभ समारोपाला महाशिवरात्रीचा योग!
‘आप’च्या दिल्ली दारू धोरणामुळे २,००२ कोटी रुपयांचा महसूल तोटा!
‘संभाजी महाराजांचा छळ ४० दिवस दाखवला असता तर विपरीत परिणाम झाला असता’
सोमवारी सकाळी ८ वाजता कृष्णा सासूकडे गेला होता. तिला रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून त्याने सासू बाबीला टेम्पोत मागे बसवले, आणि तो देखील टेम्पोत मागे गेला आणि त्याने टेम्पोचे शटर बंद करून सासूच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. त्यानंतर सासूला टेम्पोतच पेट्रोल ओतून पेटवून दिले. या जाळपोळीत कृष्णा हा देखील गंभीर जखमी होऊन त्याचा देखील मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने टेम्पोचे शटर उघडून दोघांना बाहेर काढले आणि वीर सावरकर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत्यू घोषित केले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी मृत जावया विरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.