उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक डीप- फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची बाब समोर आली आहे. डीप- फेक प्रकरण समोर येताच या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा डीप- फेक व्हिडिओ प्यारा इस्लाम नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या व्हायरल होत असलेल्या डीप- फेक व्हिडिओमध्ये, योगी आदित्यनाथ हे मुस्लिम टोपी घातलेले दिसत असून पाठीमागे एक गाणे वाजत आहे. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात, आणखी एक व्यक्ती देखील दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत ज्याने एआयच्या मदतीने हा बनावट व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. प्यारा इस्लाम या अकाउंटसंबंधी देखील तपास केला जात आहे.
हजरतगंजच्या नरही भागात राहणारे भाजप नेते राजकुमार तिवारी यांनी सोशल मीडियावर डीप- फेक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. या व्हिडिओसंदर्भात, बुधवारी रात्री उशिरा लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५३, १९६ (१), २९९ आणि आयटी कायद्याच्या ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हजरतगंज पोलिस सायबर क्राईम सेलच्या मदतीने डीप-फेक व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
युक्रेन- रशिया युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेसाठी पुढाकार
वादानंतर समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चे सर्व व्हिडीओ हटवले
याआधीही सीएम योगी यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केवळ मुख्यमंत्री योगीच नाही तर पंतप्रधान मोदी आणि महात्मा गांधी यांचेही डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. या प्रकरणांनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.