महाकुंभ मेळ्यात दररोज लाखो भाविक सहभागी होत त्रिवेणी संगमात स्नान करत आहेत. माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांची काल प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, काल तब्बल २ करोड भाविकांनी संगमात स्नान केले. देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, इतर राज्यातील मुख्यमंत्री, विरोधक, नेते मंडळींनी संगमात स्नान केले आहे, करत आहेत. याच दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, काही लोकांनी गुपचूप महाकुंभात स्नान केले आणि जनतेला जावू नका म्हणून सांगत आहेत. तसेच महाकुंभात स्नान करणाऱ्या भाविकांचा ५० करोडचा आकडा लवकरच पार होईल असे सांगितले. बुधवारी (१२ फेब्रुवारी) बागपत येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, हा नवा उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २५ करोड आहे आणि उद्या (१३ फेब्रुवारी) महाकुंभ मेळ्यात ५० करोड भाविक त्रिवेणी संगमात स्नान करतील. नाव न घेता विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, काही लोकांनी लपून-छपून कोरोनाची लस घेतली आणि इतरांना सांगितले लस घेवू नका, त्यांना सवयच आहे तशी. अशाच सवयीप्रमाणे काहींनी लपून-छपून महाकुंभच्या संगमात स्नान केले आणि लोकांना जाऊ नका असे सांगत आहेत.
हे ही वाचा:
लालूप्रसाद यादव म्हणतात, जब तक बिहार मे है लालू…
अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलांना मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची ओळख
निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
युक्रेन- रशिया युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेसाठी पुढाकार
पण, जनता यांची कुठे ऐकणार आहे, त्यांचे वास्तव जनतेला कळले आहे. करोडोच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये सामील झाले आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत अशीच संख्या असणार आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. दरम्यान, आतापर्यंत ४८ करोडहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केल्याचे समोर आले आहे. आजही घाटावर प्रचंड भाविकांची गर्दी दिसून आली. शहरामध्ये वाहनांवर प्रवेश बंदी घातल्यामुळे भाविकांना पायी चालत यावे लागत आहे.