जीर्णोद्धारित सोमनाथ मंदिर भाविकांसाठी पुन्हा उघडल्याच्या ७५ वर्षांनिमित्त एका लेखामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुजरातमधील मंदिराच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि वेळोवेळी त्याची पुनर्बांधणी करणाऱ्यांचे संघर्ष आणि बलिदान कधीही विसरले जाणार नाही. सोमनाथ हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून भारताच्या अखंड आत्मशक्तीचे, सांस्कृतिक सातत्याचे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ११ मे १९५१ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालेल्या मंदिर लोकार्पणाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली.
पंतप्रधानांनी लिहिले की, अनेक वेळा आक्रमणे, विध्वंस आणि लुटीचा सामना करूनही सोमनाथ मंदिर भारताच्या श्रद्धा आणि संस्कृतीचे केंद्र राहिले. त्यांनी नमूद केले की, सोमनाथची कथा ही भारताच्या त्या जिवंत आत्म्याची कथा आहे, ज्याला कितीही वेळा तोडण्याचा प्रयत्न झाला तरी तो पुन्हा उभा राहिला. प्रभास क्षेत्राचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हे ठिकाण प्राचीन काळापासून श्रद्धा, तपस्या आणि अध्यात्माचे महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे.
लेखात सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचा सविस्तर आढावा घेताना पंतप्रधानांनी विविध काळात झालेल्या आक्रमणांचा उल्लेख केला आहे. मंदिरावर अनेक वेळा विध्वंसक हल्ले झाले, मात्र प्रत्येक वेळी समाजाने ते पुन्हा उभे केले. यामुळे सोमनाथ भारताच्या पुनरुत्थानाच्या शक्तीचे प्रतीक बनल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी विशेषतः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. स्वातंत्र्यानंतर देश एकत्रीकरणाचे मोठे काम पूर्ण करत असताना सरदार पटेल यांनी १३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला होता. हा केवळ मंदिराचा पुनर्निर्माण प्रकल्प नव्हता, तर भारताच्या आत्मविश्वासाचे पुनरुज्जीवन होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
लेखात के. एम. मुन्शी, जामसाहेब दिग्विजयसिंहजी आणि इतर अनेक व्यक्तींनी या पुनर्निर्माणात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख आहे. त्या काळात अनेक अडचणी आणि राजकीय मतभेद असूनही समाजाच्या सहभागातून मंदिराचे पुनर्निर्माण पूर्ण करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी भूमिका घेतली होती. मात्र राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ हे भारताच्या सांस्कृतिक चेतनेचे प्रतीक असल्याचे सांगत उद्घाटन कार्यक्रमात सहभाग घेतला, असे पंतप्रधानांनी लिहिले.
पंतप्रधानांनी आपल्या लेखात “विकासही आणि वारसाही” या दृष्टिकोनावर भर दिला. गेल्या काही वर्षांत देशभरातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. काशी विश्वनाथ मंदिर, केदारनाथ मंदिर, राम मंदिर, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि कामाख्या मंदिर यांसारख्या स्थळांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देताना भारताच्या परंपरा आणि वारसा यांचे जतन करण्यालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे.
हे ही वाचा:
भांडुपच्या डोंगराळ भागात गांजाची रोपे; ‘ड्रग्स’ शेतीच्या संशयाने खळबळ
हाफिज सईदचा निकटवर्तीय दहशतवादी इस्माईल अहमद आढळला मृतावस्थेत
सत्तास्थापनेसाठी DMK-AIADMK ला संधी दिल्यास TVK आमदारांचे राजीनामे?
पाकिस्तानी सैन्याकडून पाच बलुच नागरिकांचे अपहरण
सोमनाथ मंदिराशी स्वतःच्या भावनिक नात्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला. गुजरातचा मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून अनेक वेळा सोमनाथला भेट दिल्याचे त्यांनी नमूद केले. सोमनाथ परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा, समुद्रकिनारी विकासकामे, यात्रेकरूंकरिता सुविधा आणि सांस्कृतिक जतन यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.
लेखाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सोमनाथ धामाला भेट देण्याचे आवाहन केले. सोमनाथ हा केवळ मंदिर नसून भारताच्या अमर चेतनेचे प्रतीक आहे. श्रद्धा, संस्कृती आणि एकतेच्या बळावर भारताने प्रत्येक संकटावर मात केली असून, भविष्यातही हीच शक्ती देशाला पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







