30 C
Mumbai
Monday, September 5, 2022
घरसंपादकीयशिवसेनेचा खयाली पुलाव आणि आंधळी कोशिंबीर

शिवसेनेचा खयाली पुलाव आणि आंधळी कोशिंबीर

अमित शहा यांनी शिवसेनेवर शरसंधान करून त्यांची पोलखोल केली आहे

Related

आपल्याकडे सत्ता आहे, आपले कोण काय वाकडे करणार? या गैरसमजात सामनातून उधळलेली शेलकी मुक्ताफळे आणि जाहीरपणे केलेल्या वक्तव्यांचा व्याजासह हिशोब करण्याचा अमित शहा यांनी पूर्ण मूड बनवला आहे, एवढाच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ. राजकारणात दगाबाजी करणाऱ्यांना जमीनदोस्त करा, हे अमित शहा यांचे शब्द आहेत. राजकीय भाषेत याला थंड करून खाणे म्हणतात. अमित शहा यांना कसलीत घाई नसते. गृहमंत्री पदावर असताना ज्या पी. चिदंबरम यांनी त्यांना तुरुंगात टाकले. त्याच चिदंबरम यांच्या इतके अमित शहा कोणाला माहीत असतील. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांनी अमित शहा यांना सोहराबुद्दीन प्रकरणात अटक केली होती. तारीख होती २२ जुलै २०१०. अमित शहा गृहमंत्री असताना २२ ऑगस्ट २०१९ मध्ये चिदंबरम यांना आर्थिक घोटाळाप्रकरणी अटक झाली.
परंतु चिदंबरम यांच्या उदाहरणातून उद्धव ठाकरे काही शिकले नाहीत.

मुख्यमंत्री म्हणून विधी मंडळात भाषण करताना देशाच्या गृहमंत्र्याला बेशरम आणि निर्लज्ज म्हणताना आपण फार मोठा पराक्रम केला आहे, असे उद्धवना वाटले असावे. तेव्हा अमित शहा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आपण बोललो ते खपून गेले असे ठाकरे यांनाही वाटले असावे. परंतु हा खोटारडेपणा आता अंगावर शेकण्याची वेळ आली आहे.
खयाली पुलावमुळे शिवसेनेने स्वत:चे नुकसान करून घेतले तो पुलाव नेमका काय आहे?

शिवसेनाप्रमुखे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला शिवसेनाप्रमुख म्हणवून घेणे टाळले. तेव्हा शिवसेनाप्रमुख आणि आपल्यातले अंतर त्यांना कळत असावे असा लोकांचा गैरसमज झाला होता. त्यांनी स्वत:ला शिवसेनाप्रमुख म्हणणे टाळले तरी आपण त्यांच्यासारखेच आहोत असा समज मात्र त्यांनी करून घेतला होता. त्यामुळे जमत नसताना ते शिवसेनाप्रमुखांसारखे वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करीत राहीले आणि हास्यास्पद बनले.
मी म्हणजे महाराष्ट्र, मीच महाराष्ट्राची अस्मिता, माझा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. शिवसेनाप्रमुख ज्या भाजपाला कमळाबाई म्हणायचे त्या कमळाबाईची देशभरात इतकी ताकद आहे की उद्धव सेनेला ती चिमटीत उचलू शकते.

राजकारणात अन्याय एकवेळ सहन करता येईल, परंतु दगाबाजी सहन करू नका. भाजपाशी विश्वासघात करणाऱ्या उद्धव सेनेला येत्या निवडणुकीत जमीनदोस्त करा, असा आदेश भाजपा नेते, गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिला. शहा हे अत्यंत आक्रमक नेते आहेत, परंतु आजचा त्यांचा पवित्रा पाहून भाजपा कार्यकर्तेही अवाक झाले. बंद दाराआड झालेल्या चर्चेत फक्त अडीच मिनिटांची चर्चा राजकारणावर झाली. उर्वरीत चर्चा फक्त वडापाव आणि मिसळवर झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत उद्धव यांच्या उपस्थितीत देवेंद्र यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी धनुष्य बाणावर शिक्का मारा, असे आवाहन आपण केले होते. त्यामुळे उद्धव यांना मी मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले होते ही निव्वळ लोणकढी थाप आहे.

उद्धव यांचा डोळा मुख्यमंत्री पदावर कसा होता हे सांगणारा एक गौप्यस्फोट शहा यांनी केला. शहा इतके तपशीलात यापूर्वी कधी बोलले नव्हते. लोकसभेच्या जागांच्या वाटाघाटी सुरू असताना एका रात्री २ वाजता मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला. ते म्हणाले की मी मातोश्रीवर आहे. मुख्यमंत्री पदाचे आश्वासन मिळाले तरच शिवसेना भाजपाशी लोकसभा निवडणुकांमध्ये युती करेल असे उद्धव यांचे म्हणणे आहे. देवेंद्र यांचे बोलणे ऐकून मी त्यांना सांगितले. तुम्ही घरी निघा, या शर्तीवर युती होणार नाही असे त्यांना सांगा. युतीचा प्रश्न निकाली निघाला होता, परंतु केंद्रीय नेतृत्वाशी पुन्हा चर्चा करून उद्धव यांनी युती घडवलीच. त्यावेळी अमित शहा यांनी तीन अटी स्पष्टपणे घातल्या होत्या. विधानसभेत भाजपा शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढणार, मुख्यमंत्रीही भाजपाचाच होणार. इतके स्पष्ट ठरले असताना उद्धव वारंवार खोटं बोलत होते, असा घणाघात शहा यांनी केला.

शिवसेनेचा जीव १५० च्या आकड्यात का अडकलाय देव जाणे? विधानसभा असो वा महापालिका शिवसेनेचे नेते टार्गेट १५० चेच ठेवतात. पक्षाचा बाजार उठला असताना, आहे ते टिकवण्याचे वांधे झाले असताना, भाजपाचे कडवे आव्हान उभे ठाकले असताना या १५० च्या टार्गेट मागील तर्क कळण्यापलिकडचा आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती आदित्य ठाकरे यांच्या दीडशे जागांच्या हट्टामुळेच तुटली. दीडशेपेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, यावर आदित्य ठाकरे ठाम होते. फार ताणले की भाजपा नेते दाती तृण धरून शरण येतील आणि युती करतील हा शिवसेनेचा होरा होता. पण घडले भलतेच युती तुटली, भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. २०१४ मध्ये जे घडले त्यातून उद्धव ठाकरे काही शहाणपण शिकले असे दिसत नाही. आता राज्यातील सत्ता गमावलेला आणि एकनाथ चालीसामुळे तोळामासा झालेला हा पक्ष मुंबई महापालिकेसाठी १५० जागा जिंकण्याचे लक्ष ठेवून बसला आहे.

हे ही वाचा:

रस्ते अपघातांना खराब प्रकल्प अहवाल जबाबदार

शेअर बाजारात गुंतवणुकीचा पाऊस

अफगाणिस्तानमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जण ठार

Cyrus Mistry Death : सीट बेल्ट न लावल्यामुळे सायरस मिस्त्रींचा घात झाला

 

भाजपा शिंदे गटासोबत निवडणुका लढवेल आणि पुढचा महापौर हा भाजपाचाच असेल असा दावाही त्यांनी केला आहे.
सत्तेवर असलेल्या भाजपाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडणूक लढवून १५० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पक्षफुटीमुळे आळलेली उद्धव सेनाही १५० च्या खाली जायला तयार नाही. बहुधा पक्षाच्या रणनीतीकारांपेक्षा, उरल्यासुरल्या ताकदीपेक्षा उद्धव सेनेचा भरोसा न्यूमरॉलॉजीवर जास्त दिसतो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १५० चा हेका कंठाशी आला असला तरी उद्धव सेनेने महापालिकेसाठी आशा सोडलेली नाही. १५० टार्गेट कायम ठेवले आहे.

महाविकास आघाडीची सत्ता असताना येन-केन प्रकारेण मुंबईतील सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेने फिल्डींग लावली होती. आदित्य ठाकरे यांना या मोहिमेचे नेतृत्व द्यायचे, सत्तेचा पुरेपूर वापर करून महापालिका खिशात टाकायची आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाने विजयाचे ढोल-ताशे वाजवायचे अशी रणनीती ठरली होती. आदीत्य ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार वरूण सरदेसाई तर त्या दृष्टीने तयारीलाही लागले होते. निवडणुकीत जुन्या जाणत्यांना नारळ देऊन नव्या दमाच्या म्हणजे युवासेनेच्या निष्ठावंतांना मोठ्या संख्येने तिकीट द्यायची असे ठरलेही होते.

मुंबईत भाजपा नेत्यांना टाईट करण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे या वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मुदत जून २०२२ पर्यंत होती. त्यानंतर शिवसेनेला धार्जिणा असा दुसरा अधिकारी आणता आला असता. परंतु त्या आधीच पांडे गजाआड गेले, महाविकास आघाडी सरकारचा गेम वाजला. भाजपावर वरवंटा चालून विजय मिळवण्याची रणनीती साफ बुडाली. शिवसेनेतील अनेक दमदार नेते पक्ष सोडून गेल्यामुळे पक्षाचा शक्तीपात झाला आहे. पक्षाचा बोऱ्या वाजला अशी स्थिती आहे. सत्ता नसल्यामुळे पोलिस दलातील वाझे वापरून भाजपाची कोंडी करण्याचे मनोरे कोसळले आहेत. परंतु तरीही शिवसेनेचे नेतृत्व अजून हवेत आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी १५० नगरसेवक जिंकून आणण्याचे टार्गेट ठेवले असल्याचा दावा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

पेडणेकर यांची वक्तव्य फारशी गंभीरपणे घेण्यासारखी नसतात. परंतु त्यांनी सांगितलेला आकडा हा शिवसेनेच्या थिंक टॅंकमधून आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतल्या गोटातील चर्चेतून ठरलेला हा आकडा पेडणेकरबाईंच्या कानावर आला असावा. त्यांनी तो मीडियासमोर फेकला.

महापालिकेतील पक्षीय बलाबलावर नजर टाकली तर गेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फार फरक नव्हता. शिवसेनेकडे असलेल्या जागांमध्ये मनसेतून फुटलेल्या सहा नगरसेवकांची भर टाकण्यात आली. एखाद्याला मारले तर लागते, पण घरासमोर मारले तर जास्त लागते, असे सूचक वक्तव्य शहा यांनी केले आहे. अर्थात ते महापालिका निवडणुकांबाबत आहे हे स्पष्ट. अमित शहा यांच्या दौऱ्यातून भाजपाने महापालिकांचा शंखनाद केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे, हे मात्र नक्की.

मुंबई महानगरपालिकेतील बलाबल

भाजपा ८३
शिवसेना ९७
काँग्रेस २९
राष्ट्रवादी ८
मनसे १
सपा १
एमआयएम २
अभासेना १

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,935चाहतेआवड दर्शवा
1,915अनुयायीअनुकरण करा
32,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा