26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरसंपादकीयपटोले मविआला घेऊन बुडणार काय?

पटोले मविआला घेऊन बुडणार काय?

पटोले निर्णय घेताना कुणालाही विश्वासात घेत नाहीत, असा आरोप

Google News Follow

Related

काँग्रेसमध्ये प्रचंड लाथाळ्या सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. काँग्रेसला बसणारे हे दुफळीचे हादरे फक्त पक्षापुरते मर्यादीत राहणार की मविआला घेऊन बुडणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नुकतीच सांगता झाली. संपूर्ण यात्रेत संघ-भाजपाला यथेच्छ शिव्या घालण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी चालवला. त्यामुळे हाताला फारसे काही न लागता, यात्रा आटोपली. काँग्रेसमध्ये केंद्र कमजोर झाल्यामुळे संस्थानिकांचा जोर वाढलेला आहे. पक्षातील दुफळी राज्याराज्यात ठसठशीतपणे समोर येताना दिसते आहे. राजस्थानात गहेलोत विरुद्ध पायलट असा वाद धगधगत असताना, महाराष्ट्रात नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात तलवारी काढल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस जोडो यात्रे प्रचंड गरज भासते आहे.
बाळासाहेब थोरात हे संयमी काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात. नाना पटोले यांच्याप्रमाणे फार भडक आणि जळजळीत विधाने करणे हा त्यांचा पिंड नाही. विरोध करताना ते मर्यादा सोडून बोलत नाहीत. या दोन नेत्यांची व्यक्तिमत्व दोन टोकांची आहेत.

नाशिक पदवीधर मतदार संघातून युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर थोरात आणि पटोले यांच्यात वाद पेटायला सुरूवात झाली. तांबे हे थोरातांचे भाचे आहेत. पदवीधर मतदार संघातून बंडखोरी करून या युवा नेत्याने निवडणुकीत बाजी मारली. नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारीचा घोळ नाना पटोले यांनीच घातला असल्याचा थेट आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे. सत्यजीत यांच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे पटोले आणि थोरातांमध्ये आणखी भडका उडाला.

थोरातांनी हे प्रकरण काँग्रेस हायकमांडपर्यंत नेले. प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले कुणाला विश्वासात घेत नाहीत, त्यांच्यासोबत काम करणे अशक्यच आहे, अशी तक्रार केली. याबाबत मीडियामध्ये बभ्रा झाला. तरीही हायकमांडकडून तक्रारीची फार दखल घेतली गेली नाही. नेतृत्वाच्या थंड्या प्रतिसादामुळे दुखावलेल्या थोरातांनी ब्रह्मास्त्र काढले. विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने अर्ज भरायला तमाम काँग्रेस नेते हजर असताना थोरात मात्र गायब होते. नाना पटोले यांनी ही बाब मीडियाशी बोलताना ही बाब अधोरखित केली. थोरातांनी राजीनामा दिला की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. ते आपल्याशी संपर्क ठेवत नाहीत, या शब्दात पटोले यांनी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला.

विधी मंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन थोरातांनी आपण माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. मीडियासमोर थोरातांचे वाभाडे काढून पटोले यांनीही भिडण्याचे संकेत दिले आहेत. हायकमांडचे महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष असल्याचे सांगून थोरातांना दमात घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण काठावर उभे राहून मजा बघतायत. अंतर्गत साठमारीत या दोघांपैकी कुणाचाही बळी गेला, किंवा या दुफळीत पक्षाचे १२ वाजले तरी या दोघांना काडीचाही फरक पडणार नाही. परंतु या दोघांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये अंतर्गत गटबाजीचे ठोसपणे दर्शन होते आहे.

पक्षाध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत मी मीडियामध्ये प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे सूचक उद्गार अशोक चव्हाण यांनी काढले आहेत. पटोले निर्णय घेताना कुणालाही विश्वासात घेत नाहीत, असा आरोप होत असताना, ‘ही पटोले स्टाईल आहे, परंतु मला त्यांच्याबाबत काही तक्रार नाही. त्यांना जेव्हा वाटते तेव्हा ते मला फोन करतात.’ अशी मजेदार प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘जेव्हा मल्लिकार्जुन खरगे राज्याचे प्रभारी होते तेव्हा वरीष्ठ नेत्यांची समिती गठीत करण्यात आली होती. निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान होते’, अशी पुस्ती जोडायला मात्र ते विसरले नाहीत.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांचा आटापीटा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी संबंध जोडण्याचा प्रयत्न

योगी आदित्यनाथ यांचा त्रिपुरात काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबईकरांसाठी खुशखबर पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरु

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवरून काँग्रेसमध्ये किती आग धुमसते आहे, याची कल्पना येऊ शकेल. काही काँग्रेस नेत्यांनी तर पटोले महाविकास आघाडीचे तीन तेरा करीत असल्याचा आरोप केला आहे. ही बाब सत्यही आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार असे पटोले यांनी वारंवार जाहीर केले आहे.

पटोले सातत्याने शिउबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वक्तव्य करीत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे मविआलाही वारंवार हादरे बसतायत, असे मत व्यक्त केले आहे. पटोले फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतायत की काय असा संशय अनेकदा येतो असेही काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणजे फडणवीसांच्या इशाऱ्यावरून पटोले मविआला धक्के देतायत, असे काही काँग्रेस नेत्यांनी सुचवले आहे.

काँग्रेस हायकमांड या वादात काही हस्तक्षेप करण्याची शक्यता कमीच. कारण राजस्थानमध्ये हायकमांडच्या हस्तक्षेपामुळे वाद शमला नाही. सचिन पायलट आणि अशोक गहेलोत अजूनही एकमेकांच्या उरावर बसले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा फार काही करता येणार नाही हे राहुल गांधी जाणून आहेत.

शिउबाठाच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या मारामाऱ्या चिंतेचा विषय आहे. कारण उद्धव आणि आदित्य ठाकरे काँग्रेसवर प्रचंड विसंबून आहेत. त्यांना राहुल गांधी यांचा खूप मोठा आधार वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा बाजार उठला तर हे दोघे पुन्हा एकदा निराधार होण्याची भीती आहे. त्यामुळेच घरात भांडणे होतातच, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे, तर आदित्य ठाकरे यांनीही हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, अशी गुळगुळीत प्रतिक्रिया दिलेली आहे.

एकीकडे काँग्रेसमध्ये ही घमासान सुरू असताना बाळासाहेब थोरात यांना भाजपाने आमंत्रण दिले आहे. पक्षात या तुमच्या उंचीनुसार पक्षात जागा देऊ असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. एकूणच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्य सुरू झालेल्या मारामाऱ्या राज्यात महाविकास आघाडीचा बाजार उठवणार, अशी दाट शक्यता आहे. ठाकरे पिता-पुत्रांसाठी या घडामोडी काही चांगल्या नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा