काँग्रेसचे राजकारण लक्षात घ्या. आरोप करायचे, राळ उडवायची. आरोप करताना ते खरे आहेत, खोटे आहेत याबाबत शहानिशा करायची नाही. आरोप खोटे ठरले तरी माफी मागायची नाही. निलाजरेपणे नवे आरोप करायचे. रशियाकडून पाकिस्तानला लढाऊ विमानांच्या इंजिनांचा पुरवठा होणार असल्याची बातमी पाकिस्तानच्या मीडियाने प्रसिद्ध केली. त्या बातमीचा वापर करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले. हे आरोप बिनबुडाचे आहेत, हे सिद्ध झाले आहे, परंतु काँग्रेस देशाची माफी मागणार नाही. कारण दिशाभूल करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असा समज काँग्रेस नेत्यांनी करून घेतलेला आहे.
२६ ऑक्टोबर २०१६ मध्ये बीबीसीवर एक बातमी आली होती. एका प्रयोगाबाबत टॉम स्टॅफर्ड या मानसोपचार तज्ज्ञाने ही बातमी दिली होती. एखादी गोष्ट तुम्ही सतत बोलत राहीलात तर त्याचा लोकांच्या मनावर कसा प्रभाव होतो, याबाबत ही बातमी होती.
व्हँडरबिल्ट विद्यापीठातील लिसा फॅझिओ यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग झाला होता. तुमच्या कानावर जी माहिती सतत आदळत असते ती तुमच्या मूलभूत शहाणपणावर काय परिणाम करू शकते, इल्यूशन ऑफ ट्रुथ असे या प्रयोगाला नाव देण्यात आले. दोन गट करण्यात आले, एका गटाला सत्य माहिती देण्यात आली की, “पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे”. दुसऱ्या गटाला पूर्ण असत्य माहिती सांगण्यात आली की, “अटलांटिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे”. प्रयोगांती सिद्ध झाले की, जेव्हा तुम्ही सतत खोट्या माहितीचा मारा करत असता, तेव्हा सत्य माहिती असलेले काही लोकही त्यावर विश्वास ठेवायला लागतात. Repetition increases the perceived truthfulness of a statement regardless of its actual truthfulness of the listeners prior knowledge. हा त्यांचा निष्कर्ष होता. नाझी जर्मनीचा प्रचार प्रमुख जोसेफ गोबेल्सच्या सिद्धांतावर नव्याने शिक्कामोर्तब करणारा हा प्रयोग होता. भारतीयांवर काँग्रेसचे नेते नेमका हाच प्रय़ोग करीत आहेत.
जयराम रमेश हे काँग्रेसच्या जाणत्या नेत्यांपैकी आहेत. ते जे काही बोलतात, त्यात सत्याचा लवलेश नसला तरी एक रणनीती निश्चितपणे आहे. व्हॅडरबिल्ट युनिवर्सिटीच्या इल्यूशन ऑफ ट्रुथ या प्रयोगात जे काही सिद्ध झाले, त्याचार काँग्रेस भारतीयांवर प्रय़ोग करते आहे. खऱ्या खोट्याचा विचार करत राहिलो तर मोदींना पराभूत करता येणार नाही. किंबहुना मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी खोटे बोलणे हाच एक उपाय शिल्लक राहिलेला आहे, हे काँग्रेसच्या लक्षात आलेले दिसते. त्यामुळे त्यांचे प्रवक्ते, नेते सतत मीडियावर, सोशल मीडियावर खोट्याचे दळण दळत असतात.
हे ही वाचा:
‘आय लव्ह मुहम्मद’मागे आस्था कमी, षड्यंत्र जास्त
बिहार निवडणुकीचे बिगुल वाजले; दोन टप्प्यात होणार मतदान
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापिका श्रीमती गीता शहा केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी
राहुल गांधी हेच देशातील एकमेव लोकप्रिय नेते आहेत, ते युवा नेते आहेत, त्यांनाच सगळे काही कळते, ते आईनस्टाईनचा आधुनिक अवतार आहेत, नेहरु घराण्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. काळ्यापाण्याची सजा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर आहेत. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या घरी विशिष्ट कारणांसाठी पडीक असलेले, त्यांच्या पत्नी एडविना यांच्या तालावर नाचणारे, तथाकथित तुरुंगात पंचचारांकीत सुविधा उपभोगणारे नेहरु हेच ब्रिटीशांचे खरे विरोधक अशा प्रकारे नेहरु-गांधी घराण्याचे महिमामंडन आणि मोदींच्या प्रतिमेचे भंजन हाच एकमेव उद्योग काँग्रेस नेते दिवसभर करत असतात.
बोलताना किमान शत्रूराष्ट्रातील मीडियावर विसंबू नये, याचे तारतम्यही काँग्रेसच्या नेत्यांना नाही. चीनी बनावटीच्या जेएफ १७ लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण करण्यासाठी रशिया पाकिस्तानला आरडी ९३ एमए इंजिने देणार अशी बातमी पाकिस्तानच्या एका वेबसाईटने दिली. त्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला. ‘देशहित नजरेआड करून स्वताचे महिमामंडन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा हा पराभव आहे. परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी रशियाला इंजिनाचा पुरवठा पाकिस्तानला करू नये, अशी विनंती केल्यानंतरही रशियाने हा निर्णय बदलला नाही’, असाही आरोप त्यांनी केला.
येत्या डिसेंबर महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन भारतात येणार आहेत. त्या आधी त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावारोव्ह भारतात येणार आहेत. हा दौरा दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. दोन्ही देशात या दौऱ्या दरम्यान मोठे करार होण्याची शक्यता आहे. एसयू-५७ या विमानांच्या खरेदीचा कराराची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांच्या संबंधात काही बिब्बा घालता आला तर तो घालावा, असा प्रयत्न पाकिस्तानी मीडियाने केला. काही काळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, मी असे ऐकले आहे की, भारताने रशियाकडून तेल विकत घेणे बंद केले आहे. हा सुद्धा तसाच प्रकार होता. वावड्यांवर आधारीत बातम्या यापूर्वी सुद्धा अनेकदा आल्या आहेत.
रशिया पाकिस्तानात स्टील प्लांट उभारणार, अशी एक बातमी होती. प्रत्यक्षात तिथे असलेले स्टीलचे कारखाने १९७० मध्ये रशियाने उभारले होते. त्याचे पाकिस्तानी पैशातून नूतनीकरण होणार अशी खरी बातमी होती. पाकिस्तानच्या बाबतीत अशा अनेक वावड्या पाकिस्तानचे नेते आणि लष्करशहा उडवत असतात. पाकिस्तानमध्ये तेलाचे साठे सापडले, गॅसचे भांडार सापडले, पाकिस्तानमध्ये सोने सापडले. या बातम्यांमध्ये काडीचे तथ्य नसते हे जगाला समजले आहे. त्यामुळे पडताळणी केल्या वाचून जग त्यावर विश्वास ठेवत नाही. कारण पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की आहे ते उद्योग तिथे टिकत नाहीत. अलिकडेच प्रॉक्टर एण्ड गॅम्बल या मल्टीनॅशनल कंपनीने तिथून काढता पाय घेतला आहे. भारताला डावलून या अशा देशाशी संबध ठेवणे कोणाला परवडेल. जग ठेवत नाही, काँग्रेसचे नेते मात्र लगेच ठेवतात. त्याची दोन कारणे आहेत, एक तर पाकिस्तानशी त्यांचे विशेष सख्य आहे. दुसरे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक करण्यासाठी या बातम्या उपयुक्त असतात.
रशियाच्या दृष्टीने भारताचे महत्व किती हे पुतीन यांच्यापेक्षा जास्त कुणाला कळले आहे. भारत आपल्या गरजेच्या ३६ टक्के तेल आज रशियाकडून विकत घेत आहे. जगाशी वैर पत्करून भारत हे करतो आहे, हे काय पुतीन यांना माहित नाही? जगात सगळीकडे मंदीचे सावट असताना जगात भरभराट करीत असलेल्या भारताशी भुकेकंगाल पाकिस्तानसाठी संबंध बिघडवायला पुतीन म्हणजे काय राहुल गांधी आहेत?
रशियाने तात्काळ खुलासा केला की, ‘असा कोणताही करार नाही. रशियाकडून पाकिस्तानला काहीही पुरवले जात नाही. आमच्यासाठी भारत हा सर्वात महत्वाचा सामरीक भागिदार आहे. यंदाच्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी भारत आणि रशिया सामरिक संबंधांची २५ वर्षे साजरी करीत आहोत.’
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर आता खुलासा करावा. देशाच्या जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी. परंतु असे काही होणार नाही. काँग्रेसकडून नीतीमत्तेची अपेक्षा करणे म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. रशियाचे भारताशी संबंध उत्तम आहेत, ते बिघडावे यासाठी पाकिस्तान, अमेरिकेसारखे देश पाण्यात देव घालून बसले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता सुद्धा त्यापेक्षा वेगळी नाही. सत्तेसाठी देश बुडवायला काँग्रेसचे नेते तयार असतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कोलंबिया दौऱ्यात नेमके काय शिजले आहे, याबाबत भारतीयांनी सजग राहण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







