दिवाळीचा सण आठवड्यावर आलाय. सोने आणि चांदीचे दर जबरदस्त उसळी घेताना दिसतायत. ऑगस्ट २०२५ च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भारताने सोने-चांदीची दुप्पट आयात केली. तीही कमी पडेल असे चित्र आहे. सराफा बाजारात बड्या व्यापाऱ्यांनी दुकानासमोर ग्राहकांसाठी लाल गालिचे अंथरलेत खरे परंतु तिथेही नाणी आणि लगडींचा तुटवडा आहे. काही व्यापारी माल दाबून ठेवतायत. कारण ऐन दिवाळीत किंमत वाढणार हे त्यांनाही ठाऊक आहे. दिवाळी नंतर पुढे साधारण सहा महिने लग्न सोहळ्यांचा काळ आहे. दर आणखी वाढतील या भीतीने लोक आहेत त्या दरात खरेदी करतायत. गोल्ड, सिव्हर इटीएफमध्ये एकट्या सप्टेंबर महिन्यात लोकांची गुंतवणूक ३० टक्क्यांनी वाढलेली आहे.
मुंबईच्या सराफा बाजारात एरव्ही दागिन्यांसाठी गर्दी असते. यंदा मात्र लोक नाणी आणि लगडी घेण्यासाठी गर्दी करतायत. जवेरी बाजारात काही दुकाने सोन्याची नाणी आणि लगडींच्या विक्रीसाठी ओळखली जातात. त्यांचे सोने-चांदीचे स्वत:चे ब्रँड आहेत. नारायणदास मनोहरदास यांचा एन.एम. हा ब्रॅंड आहे. यांच्या दुकानासमोर तर लोक रांगा लावून नाणी खरेदी करतात. चार चार तास रांगेत उभे राहतात. आरएसबीएल हा रिद्धी सिद्धी बुलियन यांचा ब्रँड, एनआयबीआर हा नॅशनल इंडिया बुलियन रिफायनरी यांचा ब्रॅँड. आत्मवल्लभ हा आणखी एक ब्रॅंड. हे सगळे ज्वेलर्स जवेरी बाजारात सोने-चांदीची नाणी आणि लगडी विकतात. लगडी म्हणजे ज्याला आपण बिस्कीट किंवा बार म्हणतो. शहरातील छोटे-मोठे ज्वेलर याच दुकानातून ही नाणी आणि लगडी खरेदी करतात. परंतु यंदा सर्वसामान्य लोकही इथे येऊन नाणी आणि लगडी खरेदी करताना दिसतायत.
अनेक ठिकाणी माल नाही, असे सांगण्यात येत आहे. कारण मागणी मोठी आहे. ही मागणी वाढणार याचा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. परंतु इतकी मागणी वाढेल असे कुणालाही वाटले नव्हते. सर्वसामान्य माणूस सोने आणि चांदी हे धातू दागिने म्हणून न घेता गुंतवणूक म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात घेतो आहे हे पहिल्यांदाच घडते आहे. अनेक लोक शेअर विकून सोने चांदी घेतायत. कारण चालू वर्षी सोने आणि चांदीने दिलेला परताना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्याने वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही पैकी कोणत्याही धातूमध्ये हजार रुपये गुंतवले, त्याचे पैसे दिड पटीपेक्षा जास्त झाले आहेत. सोन्यापेक्षा चांदीची चमक जास्त आहे. सोने यंदाच्या वर्षात ५६ टक्क्यांनी वधारले तर चांदी ६९ टक्क्यांनी.
२०२५ च्या जानेवारी महिन्यात गोल्ड आणि सिव्हर इटीएफमध्ये झालेली एकूण गुंतवणूक ६५,४०५ कोटी होती, सप्टेंबरपर्यंत हा आकडा १,२७,६२५ कोटी झाला. एकट्या सप्टेंबर महिन्यात इटीएफचा आकडा ३० टक्क्यांनी वाढला. ज्या लोकांना सोने-चांदी विकत घेऊन घरात ठेवणे धोकादायक वाटते, असे लोक इटीएफ आणि सरकारी गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करतायत. लोकांचा कल लक्षात घेऊन अनेक सराफा व्यापाऱ्यांनी डीजिटल गोल्ड विकायला सुरूवात केलेली आहे.
वर्ष अखेरीस सोने दीड लाख आणि चांदी दोन लाख होईल ही भाकीतं जर खरी झाली, तर कदाचित एका वर्षात लोकांची गुंतवणूक दुप्पट होऊन जाईल. हे अभूतपूर्व आहे. लक्षात घ्या ऑगस्ट २०२५ च्या तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये दुप्पट सोने चांदी आयात केली होती. तीही कमी पडते आहे. हे आकडे पाहा. ऑगस्ट महिन्यात भारताने ५.४ अब्ज डॉलर खर्चून ६४.१७ मे.टन सोन्याची आयात केली. ४५१.६ दशलक्ष डॉलर खर्च करून ४१०.८ टन चांदीची खरेदी केली.
जगभरातील देशांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी जारी ठेवली आहे. त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भोगावा लागणार असे चित्र दिसते आहे. ज्यांनी गुंतवणूक केली किंवा ज्यांच्याकडे सोने चांदी होते, त्यांचे भले झाले आहे. ज्यांना ते विकत घेणे भाग आहे, त्यांची अवस्था मात्र वाईट झालेली आहे. कितीही आणा सोने-चांदी कमी पडते, अशी स्थिती आहे. विशेष करून असे लोक ज्यांना विवाहासाठी दागदागिने करायचे आहेत. सोने दोन लाख पार जाणार या भीतीने सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांनी आधी तयारी करून ठेवली नाही, त्यांचे तर प्रचंड वांधे झाले आहेत.
२४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट नंतर आता ९ कॅरेटचे दागिनेही बाजारात येण्याच्या तयारीत आहे. ९ कॅरेटमध्ये सोन्याचे प्रमाण फक्त ३७.५ टक्के असते, बाकीचे अन्य धातू असतात, त्यातही चांदीचे प्रमाण सर्वाधिक असते. सोने कडाडल्यामुळे ज्यांच्या हाती फार पैसा नाही, अशी मंडळी या ९ कॅरेट सोन्याची दणक्यात खरेदी करतील असे चित्र आहे. परंतु या सोन्यात चांदीचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथेही सोन्यामुळे चांदीचा खप वाढणार आहे.
सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल घेऊन ठेवला त्याचे कारण फक्त दसरा-दिवाळी एवढे मर्यादीत नव्हते. जगात वाढलेली सोन्या चांदीची मागणी लक्षात घेता, या दोन्ही मूल्यवान धातूंचे दर येत्या काळात चांगलेच कडाडणार हे लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी माल दाबून ठेवला. हा अंदाज अनाठायी नव्हता. २०२५ च्या ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्याच्या पहिल्या तारखेला २४ कॅरेट सोन्याचे दर कसे वधारले पाहा. १ ऑगस्ट ९९८२ रुपये प्रति ग्रॅम, १ सप्टेंबर १०५८८ रुपये, १ ऑक्टोबर ११,८६४ रुपये. चांदीच्या दराची स्थितीही वेगळी नव्हती. १ ऑगस्ट रोजी प्रति किलो चांदी १०९८३० रुपये होती, १ सप्टेंबर रोजी १२६००० रुपये आणि १ ऑक्टोबर रोजी १५२००० रुपये प्रति किलो.
हे ही वाचा..
“भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर”
देशाची सेवा करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे
२०२३-२४ मध्ये लोकांनी शेअर बाजारात चांगला पैसा कमावला. हे वर्ष मात्र शेअर बाजाराच्या दृष्टीने फारसे चांगले दिसत नाही. मार्केटमध्ये प्रचंड उतार चढाव होतायत. कोणते शेअर चालतील याबाबत भाकीतं करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांसाठी सोने-चांदी हा उत्तम पर्याय बनलेला आहे.
उसळलेला सराफा बाजार २०२६ मध्ये कोणत्या दिशेने जाणार याची भाकीतही लोक करतायत. सोने चांदी यांच्या दराबाबत जे काही सुरू आहे ती तर केवळ सुरूवात आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांनी आतापर्यंत गुंतवणूक केलेली नाही, किंवा आधी असलेली गुंतवणूक ज्यांना वाढवण्याची इच्छा आहे. त्यांनाही योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याची चमक सगळ्या जगाने अनुभवलेली आहे. त्यात आता चांदीचीही भर पडली आहे. या वर्षी तरी चांदीने सोन्यावर मात केलेली दिसते आहे. भरभरून परतावा देणाऱ्या चांदीच्या प्रेमात गुंतवणूकदार पडलेले आहेत. प्रेमात पडताना गुंतवणूकदारांनी सजग राहणे गरजे आहे. सगळे जग जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मागे धावत असते, तेव्हा डोळे उघडे आणि डोके ठिकाणावर ठेवण्याची गरज असते. अन्यथा कपाळमोक्ष नक्की असतो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







