नवी मुंबईतील कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र (ACTREC), टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २.४ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या G+११ मजली एनएसई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) सेंटर साठी भूमिपूजन करण्यात आले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) ने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाअंतर्गत टाटा मेमोरियल सेंटर (TMC) सोबत भागीदारी करून या महत्वाच्या कॅन्सर हॉस्पिटल प्रकल्पाची सुरुवात केली आहे.
या प्रकल्पात मल्टीस्पेशालिटी ब्लॉक आणि ६० बेड्सचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर उभारले जाणार आहे. हे केंद्र देशातील सर्वात मोठे आणि दक्षिण आशियातील अग्रगण्य BMT केंद्रांपैकी एक ठरणार आहे. येथे दरवर्षी सुमारे १.३ लाख ओपीडी रुग्णांना सेवा दिली जाईल तसेच ६०० पेक्षा अधिक जीव वाचवणाऱ्या BMT प्रक्रिया करण्याची क्षमता असेल. हा २.४ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा प्रकल्प ३८० कोटी रुपये खर्चाने लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपनीद्वारे EPC पद्धतीने बांधला जाणार असून, हॉस्पिटलचे कामकाज जुलै २०२७ पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नवी मुंबईत कर्करोग उपचार आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधा मोठ्या प्रमाणात बळकट होतील.
हेही वाचा..
सप्टेंबरमध्ये सोने-चांदीची दुप्पट आयात तरीही मागणी जास्त पुरवठा कमी
WHO च्या कफ सिरप संबंधीच्या ‘त्या’ प्रश्नाचे भारताने दिले उत्तर
रावळपिंडी चिकन टिक्का, मुझफ्फराबाद कुल्फी… ‘एअर फोर्स डे’निमित्तच्या मेनूची चर्चा
“भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर”
देशातील आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या प्रयत्नांत, NSE ने आपल्या CSR उपक्रमाअंतर्गत NSE फाउंडेशन मार्फत TMC द्वारा स्थापन केलेल्या ACTREC, नवी मुंबई सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत ACTREC परिसरात G+११ मजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक आणि ६० -बेड्सचे BMT सेंटर उभारले जाणार आहे. हे सेंटर संपूर्ण ACTREC साठी आउट पेशंट डिपार्टमेंट (OPD) म्हणूनही कार्य करेल.
NSE द्वारा विकसित होणारी ही सुविधा कर्करोग रुग्णांना सामान्य तसेच सुपर-स्पेशालिटी सेवा पुरवेल — विशेषतः अशा रुग्णांसाठी ज्यांना इतर आजारही आहेत. हे BMT सेंटर देशातील सर्वात मोठ्या आणि दक्षिण आशियातील प्रमुख केंद्रांपैकी एक ठरेल आणि जीवन वाचवणारे उपचार मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देईल. कोविड महामारीचा अनुभव आणि वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, NSE ने ACTREC-TMC सोबत ही भागीदारी केली आहे. ACTREC अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना, मुलांसह, किफायतशीर आणि अत्याधुनिक कर्करोग उपचार देत आले आहे.
मार्च २०२३ मध्ये NSE बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि TMC सोबत समजुता करार (MoU) केला. या प्रकल्पासाठी अंतिम पर्यावरणीय मंजुरी (EC) ११ सप्टेंबर २०२५ रोजी मिळाली आणि CIDCO कडून बांधकाम परवानगी १ ऑक्टोबर २०२५ रोजी देण्यात आली. बांधकाम L&T कडून EPC मोडमध्ये होईल आणि जुलै २०२७ पर्यंत हॉस्पिटल कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.
भूमिपूजन समारंभात NSE आणि TMC चे अनेक मान्यवर उपस्थित होते. NSE चे एमडी आणि सीईओ श्री. आशीष कुमार चौहान म्हणाले, “NSE ला या ऐतिहासिक उपक्रमात टाटा मेमोरियल सेंटरसोबत भागीदारी करताना अभिमान वाटतो. आमचे उद्दिष्ट कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणे आणि भारतात कर्करोगाविरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलणे आहे.
आम्हाला विश्वास आहे की या प्रकल्पाचा दरवर्षी हजारो रुग्णांच्या जीवनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल. मागील ३० वर्षांपासून NSE हा भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रवर्तक राहिला आहे. देशातील बचत उत्पादक भांडवलात रूपांतरित करणे, निधी उभारणी, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे आमचे ध्येय राहिले आहे. आज, टाटा मेमोरियलच्या ACTREC कॅम्पसमध्ये हा आवश्यक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक उभारून आम्ही आरोग्य क्षेत्रात त्या परिवर्तनशील उद्दिष्टाचीच पूर्तता करत आहोत.”
टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, “नवीन हॉस्पिटल ब्लॉक कर्करोग रुग्णांमधील सहवर्ती आजारांवरील (हृदय, फुफ्फुस, न्यूरॉलॉजिकल, वृक्कीय आणि जठरांत्र) उपचारांसाठी विशेष सेवांची कमतरता दूर करेल. आतापर्यंत ACTREC हे स्वतंत्र कॅन्सर सेंटर होते, त्यामुळे अशा सेवांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत असे. या प्रकल्पाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ६० -बेड्सचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) युनिट, ज्यामुळे ACTREC हे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या BMT केंद्रांपैकी एक ठरेल.
वाढत्या कर्करोग रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे, कारण सध्या हजारो रुग्ण BMT उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गुंतागुंतीची आणि अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे. या उपक्रमाद्वारे नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक सुविधा आणि जीवनरक्षक उपचार सहज व परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील, ज्यामुळे हजारो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा आणि नवीन आशा मिळेल.”







