29 C
Mumbai
Sunday, November 9, 2025
घरसंपादकीयआमीर खान मुत्तकी भारतात, ख्वाजा आसिफ म्हणतायत आम्ही रोज सैनिकांचे अत्यंसंस्कार करतोय...

आमीर खान मुत्तकी भारतात, ख्वाजा आसिफ म्हणतायत आम्ही रोज सैनिकांचे अत्यंसंस्कार करतोय…

पाकिस्तानला व्यवस्थित चेपायचे असेल तर अफगाणिस्तानसारखा भागीदार गरजेचा

Google News Follow

Related

तालिबान परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी भारतात आले आहे. तिथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी हवाईदलाने काबूलवर हल्ला केला आहे. ही उघडपणे युद्धाची चिथावणी असल्याचा दावा करत याचा वचपा काढण्याची धमकी अफगाणी नेत्यांनी दिलेली आहे. एकूणच ऑपरेशन सिंदूर २ सुरू होण्याआधी अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन तंदुरची घोषणा केलेली आहे.

तहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानच्या लष्करी तुकडीवर हल्ला करून ११ जणांचा खात्मा केल्यानंतर तिथे स्मशानकळा पसरलेली आहे. त्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने काबूलवर हवाई हल्ला केला आहे. टीटीपीचा म्होरक्या नूर वली मेहसूद याचा काटा काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. परंतु मेहसूद बचावला आहे. एका ऑडीयो टेप द्वारे त्याने हे स्पष्ट केलेले आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणतायत, आता बस्स झाले, यापुढे सहन करणार नाही. आम्ही रोज आमच्या सैनिकांचे अंत्यसंस्कार करतोय. इम्रान खान यांच्या कार्यकाळात मोठ्या संख्येने इथे अफगाणांना वसवण्यात आले, तेच ६० लाख अफगाण इथे रक्तपात घडवतायत, रक्तपात घडवणाऱ्यांना आश्रय देतायत.

म्हणजे ख्वाजा आसिफ यांनी टीटीपीच्या दहशतवादप्रकरणात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला सुद्धा लपेटण्याचा प्रयत्न केला आहे. इम्रान खान यांनीच अफगाणांना इथे मोठ्या प्रमाणात वसवले, आता हा पक्ष अफगाण दहशतवाद्यांच्या सोबत हातमिळवणी करतो आहे. अफगाणाचा काटा काढताना इम्रान खान यांचा काटा आणखी ढीला करण्याचा उद्देश या वक्तव्यामागे आहे.

आठ ऑक्टोबर रोजी टीटीपीने पाकिस्तानच्या लष्करी तुकडीवर केलेला हल्ला खैबर पख्तुनख्वा येथे झाला होता. या भागावर पाकिस्तानचे नियंत्रण जवळ जवळ संपुष्टात आले आहे. हे पाक अफगाण सीमेवरील क्षेत्र आहे. जिथे पुश्तू आणि पठाणांची बहुसंख्या आहे. ज्यांच्या निष्ठा अफगाणिस्तानसोबत आहेत. दोन देशांना वेगळी करणारी डुरॅंड लाईन अफगाणिस्तानने कधीही मान्य केली नाही. पाकिस्तानी खैबरपख्तुनख्वावर त्यांचा दावा आहे.

९ /११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानविरोधात युद्ध छेडले. त्यावेळी पाकिस्तानने अलकायदा आणि तालिबानच्या विरोधात अमेरिकेची मदत केली. हा दगाफटका आहे, असे मानून अलकायदा आणि तालिबानचा एक गट पाकिस्तानच्या विरोधात हल्ले करू लागला, त्यानेच तहरीक ए तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपी हे नाव धारण केलेले आहे. टीटीपीला भारताचे समर्थन आहे, असा दावा अलिकडे पाकिस्तानने करायला सुरूवात केलेली आहे. भारताने जेव्हा जेव्हा पाकिस्तानवर दहशतवाद प्रायोजित करण्याचे आरोप केले, तेव्हा भक्कम पुरावे दिले. पाकिस्तानला मात्र त्यांचा दावा सिद्ध करता आलेला नाही.

ख्वाजा आसिफ जे काही म्हणाले ते खोटे नाही. अवघा पाकिस्तान धगधगतो आहे. बलोचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि सिंधमध्ये आग लागलेली आहे. रोज पाकिस्तानी लष्करावर कुठे ना कुठे हल्ला होतो आहे. रोज त्यांचे सैनिक मारले जात आहेत. बलोचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा संरक्षणात फिरावे लागते अशी परिस्थिती. ८ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये एक कर्नल जुनैद आरीफ आणि मेजर तय्यब राहत मारले गेले. असे किती अधिकारी मारले गेले त्याची मोजदाजच नाही.

पाकिस्तानने आधी खैबर पख्तुनख्वावर म्हणजे त्यांच्याच एका क्षेत्रातील नागरीकांवर हवाई हल्ला केला. काही लोकांचे बळी घेतले, त्याचा वचपा म्हणून टीटीपीने हा हल्ला केला होता. दहशतीच्या जोरावर देश एकसंध ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे लष्करशहा करतायत, परंतु त्याला यश येताना दिसत नाही.

हे ही वाचा:

भारत काबूलमधील दूतावास पुन्हा सुरू करणार!

अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी म्हणतात, त्याला गोळ्या घालू

… म्हणून इस्लामाबादकडे जाणारे रस्ते कंटेनरने केले बंद

झिशान सिद्दीकींना धमकी देणाराचं रिंकू सिंगकडे मागत होता ५ कोटी!

पाकिस्तानच्या मदरशामध्ये तालिबान तयार केले आयएसआयने. अमेरिकेने इथून काढता पाय घेतल्यानंतर हा देश म्हणजे आपल्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुले होईल असे पाकिस्तानी नेत्यांना वाटले होते. परंतु प्रत्यक्षात झाले भलतेच. भारताने इथे आपले पाय रोवले. वीज, रस्ते आणि पाणी बनवण्यासाठी अफगाणिस्तानला भरभरून मदत केली. नैसर्गिक आपत्तीत इथे सर्वात पहिली मदत जर कोणाची जात असेल तर ती भारताची.

अफगाणिस्तावर भारताचा वरचष्मा आहे. येथील बगराम विमानतळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे. परंतु भारताने याला विरोध केला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर कोणत्याही परकीय सत्तेची लुडबूड नको, अशी ठाम भूमिका भारताने घेतली. भारतापाठोपाठ चीन, रशिया कझाकिस्ताननेही हीच भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानचा तर अर्थात या मागणीला विरोध आहेच, पाकिस्ताननेही अमेरिकेला विरोध करू धक्का दिलेला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर भारताचा प्रभाव आहे. तालिबानी नेत्यांना जगभरात प्रवास बंदी आहे. भारतात येण्यासाठी मुत्तकी यांना संयुक्त राष्ट्रांनी विशेष सूट दिलेली आहे. ही सुद्धा भारताच्या प्रभावाची झलक.

मुत्तकी यांचा भारतात आठ दिवस मुक्काम आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने एक मोठा धक्का आहे. एका बाजूला अफगाणिस्तान पाकिस्तानला डोळे वटारून दाखवतो आहे. दुसऱ्या बाजूला या देशाचे भारतासोबत गुटर्गू सुरू आहे, हे पाकिस्तानच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे आहे. अफगाणिस्तानकडे हवाईदल नाही. याचा अर्थ अफगाणिस्तान पाकिस्तानसोबत लढू शकत नाही, असे नाही. त्यांनी अमेरिकेला २० वर्षे झुंजवले. खैबर पख्तुनख्वामध्येही तेच झुंजतायत. त्यांना तोंड देणे पाकिस्तानी लष्कराला झेपतेय असे दिसत नाही. त्यामुळे आपल्या दोन सीमेवरील दोन शत्रू एकत्र झालेत हे पाहण्याचे दिवस पाकिस्तानी लष्करशहांवर आलेले आहेत.

मुत्तकी इतक्या प्रदीर्घ दौऱ्यावर भारतात का आले असतील याबाबत राजकीय विश्लेषक तर्क करतायत. एक बाब स्पष्ट आहे. भारताने अफगाणिस्तानला मान्यता द्यावी, अशी तालिबान सरकारची अपेक्षा आहे. भारताचा तालिबान सरकारशी संवाद असला तरी भारताने तालिबानला मान्यता दिलेली नाही. एकदा भारताने मान्यता दिली तर जगातील अनेक देश तालिबानला मान्यता देतील हे त्यांना ठाऊक आहे. त्यांना भारताच्या विश्वासाहर्तेचा शिक्का हवा आहे. तालिबानला देशाच्या विकासासाठी भारताची साथ हवी आहे. कारण मदत देताना ती वसूल करणारे चीन, अमेरिकेसारख्या देशांचा अनुभव त्यांना घेतलेला आहे. भारताने आजवर केलेली मदत केवळ मानवतेच्या धोरणातून केलेली आहे. जगभरात भारताचा वाढता दबदबा, भारताच्या अर्थकारणाची वाढलेली चमक या गोष्टीही तालिबानांना भुरळ घालयतायत. सर्वात महत्वाचे म्हणजे भारत हा पाकिस्तानचा शत्रू आहे.

भारताला जर पाकिस्तानला व्यवस्थित चेपायचे असेल तर अफगाणिस्तानसारखा भागीदार गरजेचा आहे. दऱ्या खोऱ्यांच्या या देशात मुबकल प्रमाणात मूल्यवान खनिजे आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटलेले तांबे तिथे विपूल प्रमाणात आहे. तिथे लिथियमही आहे. भविष्यात आपण जर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला तर अफगाणिस्तान आपला शेजारी होऊ शकेल. पीओके ताब्यात घेताना अफगाणिस्तानचा उपयोगही होऊ शकेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा