32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरसंपादकीयकसब्यावर बोलू काही... भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

Google News Follow

Related

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. चिंचवडमध्ये भाजपाला विजय मिळाला, कसब्यात पराभव. सुमारे तीन दशकं भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या कसब्यातील पराभव भाजपासाठी जिव्हारी लागणारा आहे. पेठांमधून तरुणांची मतं काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांना पडली ही बाब भाजपासाठी चिंताजनक आहे. कसबा मतदार संघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजपाच्या हेमंत रासने यांच्याविरोधात सुमारे ११ हजार मतांनी विजयी झाले.

ही निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. जय-पराजय एक ते दीड हजारच्या फरकाने होईल, असे बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात धंगेकर दणदणीत मतांनी जिंकले. भाजपाच्या हेमंत रासने यांना ६२२४४ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना ७३१९४ मतं पडली. एकूण मतं सुमारे २७६२०३. एकूण मतदान १३८०१८ झाले. २०१९ च्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना ७५४९२ काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना ४७२९६ एकूण मतदान १५००९३ एवढं झालं होते.

याचा अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १२ हजार मतं कमी होऊनही काँग्रेसची मतं २५८९८ मतं वाढली. अर्थ स्पष्ट आहे की भाजपाची मतं काही प्रमाणात काँग्रेसला मिळाली. कसब्यात ब्राह्मणांची सुमारे १३ टक्के मतं आहेत. ब्राह्मण समाज हा भाजपाचा परंपरागत मतदार आहे. जनसंघाची सुरूवातीची ओळख शेठजी-भटजींचा पक्ष अशी होती, कारण ब्राह्मण कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षात मोठ्या संख्येने होते. सोशल इंजिनिअरींगचा प्रय़ोग करून भाजपाने अठरा पगड जातीत आपला विस्तार केला. परंतु २०१९ मध्ये कोथरुडच्या भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यानंतर भाजपा नेतृत्व ब्राह्मण समाजाला गृहित धरतेय अशी चर्चा सुरू झाली.

हे ही वाचा:

ओदिशात सापडले १०० नंबरी सोने…

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे सुश्मिता सेनने लिहिले आणि…

कुणाचा महाराष्ट्रद्रोह, कुणाचा देशद्रोह?

आता पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेता करणार निवडणूक आयुक्ताची निवड

प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर सुरक्षित मतदार संघाच्या शोधात चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्यात प्रवेश करते झाले. त्यांनी मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून कोथरुडवर दावा सांगितला. २०१९ मध्ये या मतदार संघातून लढून ते विजयी झाले. तेव्हा पासून ब्राह्मण मतदारांमध्ये अस्वस्थता होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात एखादा ब्राह्मण उमेदवार दिला जाईल अशी अपेक्षा होती.

धीरज घाटे आणि हेमंत रासने यांच्या नावाची चर्चा होती. रासने यांनी उमेदवारी मिळाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी आपले दान रासने यांच्या पारड्यात टाकले. कसब्यात एकेकाळी पेठांचे प्राबल्य होते. पुण्याच्या विस्तारामुळे आता ते कमी झाले आहे. परंतु तरीही एकूण मतदारांमध्ये ब्राह्मणांचा टक्का सुमारे १३ च्या आसपास आहे. कोथरुडमध्ये २०१९ मध्ये चंद्रकांत पाटलांच्या घुसखोरीमुळे नाराज झालेला ब्राह्मण समाज भाजपासोबत उभा राहिला. परंतु रासने यांना ते भाग्य मिळाले नाही. पेठांमधून बहुसंख्य मतं भाजपाला मिळाली असली तरी तरुणांनी मात्र ठरवून काँग्रेसला मतदान केले.

लक्षात घ्या नोटा दाबून नाराजी व्यक्त करण्याचा मध्यम मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. हिंदू महासंघाचा बॅनर घेऊन ब्राह्मणांवर होणाऱ्या अन्यायाच्याविरोधात निवडणूक लढत असल्याचा दावा करणारे आनंद दवे यांना मत देऊ आपले मत या तरुणांनी वाया जाऊ दिले नाही. भाजपाला आव्हान देणाऱ्या धंगेकर यांच्या पारड्यातच हे मत टाकले आणि ‘आम्हाला गृहित धरू नका’, असा इशारा दिला. कुलकर्णी, टिळकांनंतर बापटांचा नंबर लागणार हा विरोधकांचा प्रचार भाजपाच्या अंगाशी आला. आजाराने अत्यंत जर्जर झालेले गिरीश बापट पक्षाच्या झेंड्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले. त्यांच्या आवाहनालाही ब्राह्मण समाजातील तरुणांनी प्रतिसाद दिला नाही. भाजपाच्या सबका साथ या घोषणेत ब्राह्मणांना स्थान नाही का?

भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगच्या प्रयोगात ब्राह्मणांचा समावेश नाही का असा या तरुणांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणविरोधी प्रचार सुरू झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब पुरंदरे, राम गणेश गडकरी अशा दिग्गजांना लक्ष्य बनवण्यात आले. ब्राह्मण हे केवळ निमित्त होते, या तोफा खरे तर भाजपाच्या विरोधात होत्या, बऱ्याच प्रमाणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात. भाजपाने या विखाराला चोख प्रत्युत्तर दिले. विरोधकांचा पर्दाफाश केला. परंतु निवडणुकीच्या राजकारणात मात्र पक्ष ब्राह्मणांना गृहित धरतोय, ही भावना पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आली नाही किंवा लक्षात येऊन भाजपाने याची दखल घेतली नाही. आपल्याला डावलेले जातेय ही सल नष्ट करता आली नाही.

संतापाला डोळे नसतात असे म्हणतात, भाजपाला धडा शिकवण्यासाठी ब्राह्मणद्वेष्ट्या काँग्रेसला मतदान करण्याची वेळ काही जणांवर आली. अशी अनेक घरं आहेत जिथे आई-वडील किंवा आजी आजोबांची मतं भाजपाच्या कमळ चिन्हाला पडली, परंतु घरातल्या तरुणाने मात्र हाताच्या पंजासमोरचे बटण दाबले. भाजपाला या संतापाची दखल घ्यावी लागेल. राजकीय रणनीती म्हणून सोशल इंजिनिअरींगच्या नावाखाली सर्व जाती जमातींना प्रतिनिधीत्व देण्याचे भाजपाचे धोरण असेल तर त्यात अठरापगड जातींसह ब्राह्मण सुद्धा येतात याचे भान नेतृत्वाने ठेवायला हवे.

मुस्लिमांनी दुबई, सौदीतून येऊन मतदान करावं, मेलेल्यांच्या नावाने मतदान करावं असं आवाहन महाविकास आघाडीच्या एका प्रचारसभेत करण्यात आलं होतं. हे आवाहन केलं नसतं तरी ती मतं मविआलाच पडणार होती. या आवाहनामुळे खळबळ निर्माण झाली. हिंदूंनी या आवाहनातून धडा मात्र घेतला नाही. हिंदुत्वापेक्षा जात प्रभावी ठरली. चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार आणि ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटे यांनी घेतलेल्या मतांचा आकडा पाहिला तर अश्विनी जगताप यांच्या विजयाचे खरे शिल्पकार कलाटेच आहेत, हे लक्षात येते.

कलाटे नसते तर चिंचवडमध्ये काय झाले असेत यांची कल्पना करा. भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ६४३०० नाना काटे ५५७४७ आणि ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटे यांना १९ राऊंड अखेरीस २२७०० मतं पडली होती. महाराष्ट्रात ब्राह्मणांचा टक्का जेमतेम ३ च्या आसपास आहे. राजकारणातील अल्पसंख्यांक असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा कसब्याच्या निमित्ताने मूठभर ब्राह्मणांनी दिला आहे. भाजपाने यातून धडा शिकायला हवा आणि आयत्या बिळावर बसलेल्या नागोबांचा इलाज करायला हवा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा