32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरसंपादकीयनीतेश राणेंची दुसरी भविष्यवाणी पडणार... राऊत राष्ट्रवादीत नाहीत, पण राष्ट्रवादीचे आहेत!

नीतेश राणेंची दुसरी भविष्यवाणी पडणार… राऊत राष्ट्रवादीत नाहीत, पण राष्ट्रवादीचे आहेत!

‘शिउबाठाचे नेते संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील’, असा दावा त्यांनी केला आहे.

Google News Follow

Related

भाजपा आमदार नीतेश नारायणराव राणे यांचे एक भाकीत खरे ठरले. १ मेची वज्रमूठ सभा अखेरची, त्यानंतर मविआची वज्रमूठ सभा होणार नाही, असे ते म्हणाले होते. राणे जे म्हणाले होते तेच घडले. पहिल्या भविष्यवाणीच्या दणदणीत यशानंतर त्यांना दुसरी भविष्यवाणी करावीशी वाटणे स्वाभाविक आहे. ‘शिउबाठाचे नेते संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील’, असा दावा त्यांनी केला आहे. ही भविष्यवाणी मात्र साफ कोसळेल अशी दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांचे मेतकूट फार जुने आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर ते सर्वसामान्य लोकांना समजले. परतुं दिल्लीत जे पत्रकार अनेक वर्ष वास्तव्याला आहेत. त्यांना मात्र हे समीकरण पक्के ठाऊक आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना भोजन विश्रांतीच्या काळात राऊत आणि पवार एकत्र संसदेबाहेर पडतात. पवारांच्या कारमध्ये बसून हे दोघे निघतात. ६ जनपथवर जाऊन एकत्र जेवण करतात. हे दृष्य नेहमीचं. मविआचे समीकरण जुळवण्यात या मेतकुटाची भूमिका महत्वाची ठरली. परंतु म्हणून राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असे चित्र तूर्तास तरी दिसत नाही. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार असतील तर मी राष्ट्रवादीत येईन अशी अट राऊतांनी ठेवलेली आहे, असा दावा नीतेश राणे यांनी केला आहे.

भाकीत कधी ‘जर तर’ च्या भाषेत केलं जात नाही. ‘जर तर’च्या भाषेत शक्यता व्यक्त केली जाते. १ मे नंतर वज्रमूठ सभा होणार नाही, हे भाकीत होते. १० जूनपर्यंत राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, ही शक्यता आहे. ही शक्यता अजित पवार पक्ष सोडतील, या गृहितकाच्या आधारावर व्यक्त करण्यात आली आहे. तसेही काही घडताना दिसत नाही.

‘सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करण्याची तूर्तास तरी इच्छा नाही’, असे स्वत:  पवारांनी स्पष्ट केले आहे. आधी एखाद्या विश्वासू शिलेदाराला पवार महत्वाची जबाबदारी सोपवतील. हा नेता जयंत पाटील, प्रफुल पटेल असा कोणीही असू शकतो. त्याच्या करवी सुप्रिया सुळेंना अनुकूल राहील अशाप्रकारे पक्षाची मांडणी करण्यात येईल. त्यामुळे नाराजीचे खापर सुळे यांच्या डोक्यावर फुटणार नाही. सुळे विरोधकांचा निकाल लागेल.

अजित पवारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. संघटनेमध्ये त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आले आहे. परंतु पक्ष सोडण्याचा अजित पवारांकडे पर्याय असला तरी तो सोपा नाही. कारण शरद पवार हे उद्धव ठाकरे नाहीत, अजित पवार हे एकनाथ शिंदे नाहीत. त्यामुळे ते अजितदादांनी पक्ष सोडला तर राऊत राष्ट्रवादीत येतील या म्हणण्यात फार तथ्य दिसत नाही. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या सोबत असणे हे पवारांना फायद्याचे आहे आणि अजित पवार हे विरोधी पक्ष नेतेपदी असणे हे भाजपाला फायदेशीर आहे. हे गणित सध्यातरी बिघडण्याची शक्यता कमी.

राऊतांनी सामनातून रोज अजित पवारांना ठोकावं आणि अस्वस्थ करावं ही पवारांची रणनीती आहे. उद्या ते राष्ट्रवादीमध्ये येऊन हे कसे होईल?   उद्धव यांच्याकडे राऊतांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची क्षमता उरलेली नाही हे खरे. परंतु  तुर्तास याचा विचार आता करण्याची गरज राऊतांना नाही. कारण गेल्या वर्षीच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलेली आहे. अजून पाच वर्ष त्यांच्या हाताशी आहेत. एवढ्या आधीपासून राज्यसभेसाठी फिल्डींग लावण्यात काहीच हशील नाही. पाच वर्षांनी काय होईल हे आज सांगण्याची क्षमता फक्त ब्रह्मदेवात आहे.

विरोधकाच्यी टीममध्ये आपली किंवा आपल्या सोयीची माणसं असावी हो प्रत्येक नेत्याला वाटत असते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे सदासर्वदा पक्षाची सूत्र राहावी, ही जशी भाजपाची इच्छा आहे. तसेच संजय राऊत हे शिउबाठात राहून आपले राहावे ही पवारांची इच्छा आहे. कोकीळ पक्षी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यातच ठेवतो, असे म्हणतात. हे कितपत खरे आहे ते ठाऊक नाही, परंतु नेते मात्र आपली खास माणसं विरोधकाच्या गोटात ठेवतात. दुसऱ्या पक्षात आपला एजेंडा रावबणे त्यामुळे शक्य होते आणि दुसऱ्या पक्षाला आपल्या कलाने, आपल्या यशासाठी चालवणेही शक्य होते.

‘शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर एक समिती नेमली. भाजपासोबत जाण्यास इच्छूक असलेल्या नेत्यांचा या समितीमध्ये भरणा असूनही पवार हेच अध्यक्ष अशी भूमिका या नेत्यांना घ्यावी लागली, असा दावा सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे हे वैशिष्ट्य आहे की दुसऱ्या पक्षात काय घडतेय, कोण कोणासोबत आहे, कोणाला कोणाचा गेम करायचाय, याची बित्तंबातमी सामनाच्या कार्यकारी संपादकांकडे असते, परंतु पक्षप्रमुखाच्या बुडाखालून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली याबाबत मात्र त्यांना काहीच कळले नाही. परंतु तरीही राऊतांनी ‘सामना’मध्ये राहून पवार कसे राष्ट्रीय नेते आहेत, महाराष्ट्राचे कसे आधारवड आहेत, हे सतत सांगणे आणि सांगत राहाणे ही पवारांची गरज आहे.

हे ही वाचा:

केदार शिंदेंना ‘केरळ स्टोरी’ची पोटदुखी का?

‘भ्रष्टाचार रेट कार्ड’ प्रसिद्ध केल्याबद्दल निवडणूक आयोगाची काँग्रेसला नोटीस

सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, मुंबई विमानतळावर ११ जणांना अटक

बांधवगडमध्ये सापडले ११ गुहा, दोन स्तूप, २,००० वर्षे जुने मानवनिर्मित जलस्रोत

पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना, नेत्यांना उकीरडे फुंकणाऱ्या बेवारस कुत्र्यांची उपमा या अग्रलेखात दिलेली आहे. ‘सामनाकारां’कडे अशा थुकरट उपमा आणि अलंकारांचा प्रचंड साठा आहे. एका पक्षात राहून दुसऱ्या पक्षाच्या जेवणावळीतल्या उष्ट्या पत्रावळी चाटणाऱ्या श्वानांबाबतही त्यांनी कधी तरी लिहावं.

राऊतांनी राष्ट्रवादीवर इतकं लक्ष ठेवण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या बॅगेवर ठेवले असते, तर बरे झाले असते, या शब्दात छगन भुजबळ यांनी राऊतांचा पंचनामा केला आहे. राऊत हे राष्ट्रवादीत नसले तरी राष्ट्रवादीचे असल्यामुळे भुजबळांनी मारलेले जोडे ते फार मनावर घेणार नाहीत. एव्हाना त्यांना जोडे खाण्याची सवय झालेली आहे. वारंवार जोडे खाऊनही त्यांची राष्ट्रवादीबाबतची निष्ठा पातळ होत नाही हे विशेष.

नीतेश राणे यांचे दुसरे भाकीत का फसू शकते, याची कारणे ही अशी आहेत. अर्थात रोज मीडियाच्या कॅमेरासमोर खोटे बोलणाऱ्या संजय राऊतांशी स्पर्धा करायची असेल तर त्यांना थापा मारण्याचा गुणही आत्मसात करावा लागेल. बहुधा ते त्याची सवय करून घेतायत. ते संजय राऊतांना वरताण ठरू शकतात म्हणूनच तर त्यांची नियुक्ती राऊतांना उत्तर देण्यासाठी करण्यात आली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा