पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीवर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. ट्रम्प यांनी वी मिस्ड यू अ लॉट… असे म्हणत मोदी यांना दिलेल्या आलिंगनाची चर्चा आहे. बऱ्याच घोषणा झाल्या आहेत, त्यात काही खास घोषणा अशा आहेत, ज्यामुळे भारताचे नाठाळ शेजारी थोडे वठणीवर येऊ शकतील.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात ट्रम्प टेरीफच्या संदर्भात काय बोलतात, याकडे भारताचे लक्ष होतेच, शिवाय अंतर्गत सुरक्षेबाबत काही महत्वाच्या घोषणा या दौऱ्यानिमित्त होणे अपेक्षित होते. तुम्ही जेवढे कर आमच्या मालावर आकाराल तेवढाच कर आम्ही आकारू असे सरसकट धोरण ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहे.
अमेरीकेत भारत जेवढी निर्यात करतो, त्यातूलनेत तिथून आयात कमी करतो. अमेरीकेत डेमोक्रॅट्सची सत्ता असताना पर्यावरणवाद्यांच्या दबावाखाली अमेरीकेने तेलाचे उत्खनन बंद केले होते. परंतु पर्यावरणवाद्यांचा विरोध धाब्यावर बसवून ट्रम्प यांनी तेलाचे उत्खनन पुन्हा सुरू केले आहे. अमेरीकेकडे सौदी अरबिया पेक्षा जास्त तेलसाठी आहेत. हे तेल जगाला विकून पैसा कमावण्याचे धोरण ट्रम्प यांनी ठेवले आहे. सध्या भारत रशिया आणि सौदी अरेबियाकडून तेल विकत घेतो. कतारकडून गॅस विकत घेतो. तेल आणि गॅसच्या एकूण आवश्यकतेपैकी काही भाग अमेरीकेकडून विकत घेतला तर
अमेरीकेच्या दृष्टीने भारताशी व्यापार करताना जी तूट येते ती सहज भरून येऊ शकेल. कारण भारत हा जगातील बड्या आयातदारांपैकी एक देश आहे.
भारताकडून जेवढी आयात होते, निर्यातही तेवढीच हवी हे ट्रम्प यांना हवे आहे. तेल आणि गॅसची आयात भारताने सुरू केली की हे उद्दीष्ट सहज साध्य होऊ शकेल. हे झाले अमेरिकेच्या बाजूने. भारताला अमेरीकेकडून अद्ययावत शस्त्र हवी आहेत. त्यामध्येही तेजस या भारतीय बनावटीच्या विमानांसाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रीक्स या कंपनीच्या एफ-४-४-आयएन २० या इंजिनांसाठी भारताचा करार झाला आहे. परंतु बायडन प्रशासनाने हा करार गेली दोन वर्षे खुंटीला टांगून ठेवला आहे. ट्रम्प यांनी भारताला अरबो रुपयांची शस्त्रे निर्यात करण्याचे सुतोवाच केले आहे. त्यात त्यांनी फिफ्थ जनरेशनची एफ-३५ ही स्टेल्थ विमाने देण्याची तयारी दाखवली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेतून आलेल्या स्थलांतरितांनी सांगितली ‘डंकी मार्गा’ची सुरवात ते शेवट!
“श्रीमान पंतप्रधान, तुम्ही महान आहात” म्हणत ट्रम्प यांच्याकडून मोदींना खास भेट!
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे नेतृत्व आकाश शिंदेकडे
बिजापूर चकमकीत आयईडी स्फोटाच्या मास्टरमाइंडचा खात्मा
भारताला अडीच आघाड्यांवर युद्ध लढण्यासाठी हवाई दलाला लढाऊ विमानांच्या ४१ स्क्वॉड्रन्सची आवश्यकता असताना आपल्याकडे फक्त ३१ स्क्वॉड्रन आहेत. त्यातलीही रशियन बनावटीच्या जुन्या लढाऊ विमानांचा भरणा जास्त आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये १८ फायटर विमाने असतात. २०२४-२५ या आर्थिक वर्षात चीनची संरक्षण तरतूद २३१ अब्ज डॉलर्स होती तर भारताची फक्त ७५ अब्ज. भारताच्या दृष्टीने सगळ्यात चिंतादायक बाब म्हणजे भारताकडे पुरेशी लढाऊ विमाने नसताना चीनने सहाव्या पिढीचे लढाऊ विमान तयार केल्याची घोषणा केली आहे. हे स्टेल्थ असल्यामुळे रडारच्या कक्षेत न येता भारतावर आक्रमण करणे चीनला शक्यता आहे.
भारताचे पाचव्या पिढीचे एम्का हे लढाऊ विमान डीआरडीओ मार्फत तयार केले जात आहे. परंतु २०३५ आधी ते तयार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्टेल्थ विमानांसाठी भारतासमोर एफ35 चा पर्याय होता. परंतु ते देण्यास अमेरिका तयार होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मोदींच्या दौऱ्यात आपण न मागता, अमेरिकेने हे स्टेल्थ देण्याची तयारी दाखवली आहे. भारताच्या दृष्टीनेही जमेची बाब आहे. मोदी जर अमेरिकेकडून तेजससाठी आधी ठरलेल्या इंजिनांची खेप घेण्यात
यशस्वी झाले तर भारतासाठी ती आणखी एक जमेची बाजू ठरेल. अत्याधुनिक ड्रोन्स, रडार यंत्रणा आदी अनेक बाबतीत अमेरीका भारताची मदत करू शकतो.
भारताच्या वतीने अलिकडे संरक्षण सामुग्री विकत घेताना, तंत्रज्ञान हस्तांतराची आणि भारतात संयुक्त उत्पादन प्रकल्पाची मागणी करतो. एफ ३५ बाबत असे होण्याची शक्यता कमी असली तरी मोदी या दृष्टीने ताकदीने वाटाघाटी करतील, याची दाट शक्यता आहे. अमेरीकेने भारताची संरक्षण गरज भागवली आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी मदत केली, तर चीनची दादागिरी रोखणे भारताला सोपे होईल. पाकिस्तान आणि भारताच्या संरक्षण सज्जतेची तुलनाच होऊ शकत नाही.
२६/११ मुंबई हल्लाचा आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचा एकूण रोख पाहाता, बायडन यांच्या सत्ताकाळात खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याच्या ज्या कारवाया अमेरीकेत चालत असत, त्यांनाही चाप लागण्याची शक्यता आहे.
बांगलादेशात बायडन प्रशासनाच्यावतीने तख्तापालट झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या मोहमद यूनूस यांचा भारताला मोठा ताप झाला. हिंदूंचे जीवित आणि वित्त बांगलादेशात असुरक्षित झाले. मंदिरांवर हल्ले सुरू झाले. ट्रम्प यांना पत्रकारांनी जेव्हा याबाबत प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले मी बांगलादेश मोदींवर सोडतोय. याचा अर्थ बांगलादेशावर मोदींनी कारवाई केली तर अमेरिका त्यात पडणार नाही, असा काढता येईल का? अमेरिका दौऱ्याच्या सुरूवातीलाच ट्रम्पना भेटण्यापूर्वी मोदी अमेरीकी गुप्तचर संस्थांची जबाबदारी असलेल्या हिंदू धर्माबाबत प्रचंड आस्था असलेल्या तुलसी गबार्ड यांना भेटल्या. हे
सूचक आहे.
ट्रम्प यांनी मेक अमेरीका ग्रेट अगेनची घोषणा दिलेली आहे. भारताला विश्वगुरू बनवणे हा मोदींचा संकल्प आहे. मुळात या दोन्ही संकल्पना एकमेकांच्या विरोधी नसून पुरक आहेत, आणि त्यातून दोन्ही देशांची भागीदारी अधिक मजबूत होईल, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याही चुकीच्या नाहीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)