राजकीय नेता हा कोणत्याही पक्षाचा असो त्याचा एक खंदा समर्थक असतोच. अत्यंत विश्वासू, जवळचा. त्याची राजकीय सत्ता या नंबर दोनच्या बळावर स्थिरस्थावर झालेली असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची साथ लाभली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत अहमद पटेल होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी होते. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना स्पेसेक्स, टेस्लाचे मालक, चालक उद्योगपती इलॉन मस्क यांची साथ होती. त्यांनी डीपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी (DOGE) या खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. ट्रम्प यांना हा मोठा झटका आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या ‘शोले’तला ‘सांबा’ अखेर त्या विशाल खडकावरून उतरला आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत अब्जाधिश मस्क यांची साथ ट्रम्प यांच्यासाठी महत्वाची ठरली. मस्क सोबत असल्यामुळे पैसा हा काही ट्रम्प यांच्यासाठी अडचणीचा विषय राहिला नाही. अमेरिकन ‘डीप स्टेट’चा बंदोबस्त करणे, अफाट सरकारी खर्चात कपात करणे, अमेरिकेचे बुडीत चाललेले अर्थकारण सावरणे, आदी ट्रम्प यांच्या प्रचारातील मुख्य मुद्दे होते. मस्क यांना पडद्याआडून ट्रम्प यांना मदत करणे शक्य होते. परंतु ते थेट निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरले. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी त्यांनी भाषणेही ठोकली. त्यांच्या मालकीचा सोशल मीडिया ‘एक्स’चा पुरेपुर वापर केला. परंतु सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांच्यासोबत ते टीकू शकले नाहीत. उद्योगपतींना पडद्यामागून सरकारची सूत्र हलवणे जमते, मस्क यांनी सरकारमध्ये सामील होऊन चूक केली हे अखेर त्यांच्या लक्षात आले.
एखादा माणूस वर्षोनुवर्षे तुमच्या सोबत टिकवण्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची असते. तुमच्या क्षमतेवर समोरच्या माणसाचा विश्वास असावा लागतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाते असे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहे. यूपीएच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी सीबीआयने आधी अमित शहा यांच्यावरच हात टाकला. सोहराबुद्दीन शेख इन्काऊंटर प्रकरणी त्यांना अटक झाली. अमित शहा यांनी मोदींचे नाव याप्रकरणात घ्यावे म्हणून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. परंतु अमित शहा या दबावासमोर झुकले नाहीत. ही निष्ठा महत्वाची असते.
मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेता केले म्हणून छगन भुजबळ दुखावले गेले. त्यांनी बंड केले, शिवसेना फोडली. खरे तर भुजबळ फुटले त्यापूर्वी मनोहर जोशी यांच्याबाबत अशी चर्चा होती की, ते शरद पवारांच्या गळाला लागतील. परंतु त्यांनी अखेर पर्यंत शिवसेनाप्रमुखांची साथ सोडली नाही. ट्रम्प यांच्याबाबत मात्र असे चित्र दिसत नाही. माणसे टिकवणे त्यांना जमत नाही. वापरा आणि फेका हे त्यांचे सूत्र आहे. डीपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी (DOGE) मध्ये इलॉन मस्क यांच्या सोबत विवेक रामास्वामी हे भारतीय वंशाचे नेते होते. ते आधी बाहेर पडले. आता इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली आहे. त्यांनी राजकारणाला राम राम केला आहे.
हे ही वाचा:
काळाचौकी, भोईवाडा विभाग १०० टक्के भोंगा मुक्त!
तुषार देशपांडे सज्ज आहे इंग्लंड जिंकायला!
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट; दोघे अटकेत
नमाजापूर्वी ब्राह्मोस पाकिस्तानी तळांवर धडकली !
ट्रम्प यांच्यापासून वेगळे होण्याची कारणे वेगळीच आहेत. ‘बिग ब्युटीफूल बिला’वरून मतभेद झाल्यामुळे मस्क वेगळे झाले असे म्हटले जात असले तरी ते पूर्ण सत्य नाही. सरकारी खर्चात १.६ ट्रीलियनची कपात करण्यासाठी हे बिल आणण्याचा दावा ट्रम्प करीत असले तरी प्रत्यक्षात यामुळे ‘डीपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी’ (DOGE) च्या मूळ हेतूला हरताळ फासला जाणार असल्याचे मस्क यांचे मत आहे. हे बिल निराशाजनक असून यामुळे सरकारी खर्च वाढणार असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.
हे केवळ निमित्त असावे. टेरीफ अस्त्राचा वापर करून ट्रम्प यांनी जगाशी वैर ओढवून घेतले होते. चीनमध्ये मस्क यांची मोठी गुंतवणूक आहे. चीन, युरोपमध्ये टेस्लाच्या कार मोठ्या संख्येने विकल्या जातात. परंतु ट्रम्प यांच्या धोरणामुळे या देशांशी त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. मस्क यांना भारतात विलक्षण रस आहे. ट्रम्प तात्यांनी भारताशीही पंगा घ्यायला सुरूवात केली आहे. अमेरिकेखालोखाल सर्वाधिक पैसा असलेला युरोप, जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांसोबत ट्रम्प यांचे बिघ़डलेले संबंध टेस्लाच्या मूळाशी येतील हे लक्षात आल्यामुळे मस्क अस्वस्थ होते.
गेला महिनाभर ते बऱ्यापैकी शांत होते. बहुधा ते मानसिक तयारी करीत असावेत. बिग ब्युटीफूल बिलाचे निमित्त करून त्यांनी ट्रम्प यांच्या तावडीतून सुटका करून घेतली असे म्हणता येईल. सांबा अखेर गब्बरला सोडून गेला. शोले सिनेमा पाहिला असेल त्यांना हे कॅरेक्टर माहिती आहे. एका विशाल खडकावर बसलेला हा सांबा म्हणजे गब्बरचा चमचा. त्याची भलामण करणे, तो जे सांगेल ते ऐकणे हे या सांबाचे काम. गब्बरला कोणाला एखादी गोष्ट ऐकवायची असेल तर तो या सांबाला विचारतो, ‘अरे ओ सांबा, कितना इनाम रखा है सरकारने हम पर…?
मस्क यांनी गेले काही महिने ट्रम्प यांच्यासाठी सांबाची भूमिका वठवली. परंतु हा गब्बर त्या विशाल शिळेवरून आपला कधीही कडेलोट करू शकतो, हे सांबाच्या लक्षात आले आणि त्यांनी गब्बरचा नाद सोडला. माणसाचा वाईट काळ अचानक येत नाही. वाईट बातम्याही एकट्या येत नाहीत. एका बाजूला मस्क यांनी गब्बर यांची साथ सोडली आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयानेही ट्रम्प यांना बांबू दिला आहे. टेरीफ अस्त्र चालवून जगभरात उलथापालथ घडवणाऱ्या ट्रम्प यांना अमेरिकेच्या ‘कोर्ट ऑफ इंटर नॅशनल ट्रेड’ने मनमानी पद्धतीने टेरीफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना चांगलेच कोलले आहे.
ट्रम्प यांचा टेरीफबाबतचा निर्णय त्यांच्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करणारा असून अमेरिकेची व्यापार विषयक धोरणे त्यांच्या मर्जीवर अवलंबून असल्याने आर्थिक गोंधळाचे चित्र निर्माण झाले असल्याचे ताशेरे त्रिसद्स्यीय खंडपीठाने ओढले आहेत. हा निर्णय म्हणजे अमेरिकी संसदेच्या अधिकारावर अतिक्रमण आहे.
अर्थात ट्रम्प यांनी स्वभावाप्रमाणे न्यायालयावरच तुफानी टीका केलेली आहे. अमेरिकेत निर्माण झालेली आणीबाणीची परीस्थिती कशी हाताळायची याचा निर्णय करण्याचा अधिकार जनतेतून निवडून न आलेल्या न्यायाधीशांना नाही. ट्रम्प यांनी कायम अमेरिका फर्स्ट हे धोरण स्वीकारले आहे, देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी तसेच अमेरिकेचे श्रेष्ठत्व टीकवण्यासाठी अधिकारांचा वापर करणे सुरू ठेवू असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. जगाशी पंगा घेतल्यानंतर ट्रम्प आता देशाच्या संसदेशी आणि न्यायालयाशी पंगा घेण्याच्या तयारीत आहेत.
ज्या दिवशी त्यांनी टेरीफबाबतचा निर्णय जाहीर केला, त्याला अमेरिकेच्या मुक्तीचा दिवस असे म्हटले होते. आता याच मुद्द्यावरून अमेरिकेत आता घटनात्मक संघर्ष निर्माण होणार असे चित्र आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेचा प्रवास भारतात एकेकाळी दिलेल्या ‘गरिबी हटाव’च्या मार्गावर जातो आहे. भारतात या घोषणेमुळे गरिबी हटली नाही, उलट आणीबाणी नावाच्या तुरुंगात सगळा भारत कैद करण्याचा प्रयत्न झाला. ट्रम्प आता अमेरिका ग्रेट करण्याची घोषणा देत सगळ्या घटनात्मक यंत्रणांची मुस्कटदाबी करण्याच्या कामाला लागले आहेत.
शोले सिनेमात जेव्हा जेव्हा सांबा दिसला तेव्हा तो त्या विशाल शिळेवर दिसला. अमेरिकेत ट्रम्प यांच्या कृपेने ‘डीपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी’ (DOGE) नावाच्या उंच शिळेवर बसलेला इलॉन मस्क नावाचा सांबा खाली उतरलेला आहे. बहुधा ट्रम्प याच शिळेवरून आपला कडेलोट करतील अशी भीती त्याला वाटली. त्याच शिळेवर चढून आता ट्रम्प सगळ्यांना घोडा लावण्याचे काम करतायत. जगातील टेरीफची घडी बदलायला आलेले ट्रम्प आता अमेरिकेच्या लोकशाहीची घडी विस्कटणार अशी चिन्हे आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
