27 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरसंपादकीयहिंदूद्वेष हरोनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा...

हिंदूद्वेष हरोनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा…

मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी सत्ता राबवणारे निवडणुकीच्या आधी फक्त पीआरसाठी देवदर्शनाला जातात

Google News Follow

Related

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांनी आपली राजकीय अराजकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे. भगवा बुरखा पांघरलेली संभाजी ब्रिगेड नावाची एक हिरवट संघटना गेली अनेक वर्षे पवारांच्या आशीर्वादाने सुरू आहे. पवार आणि त्यांचे तमाम हिंदूविरोधी चेले चपाटे या संघटनेच्या व्यासपीठावर नियमितपणे येत असतात. २२ ऑगस्ट रोजी या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले होते. मंचावर पवारांसह काँग्रेस खासदार शाहू महाराज उपस्थित होते. त्याच व्यासपीठावर प्रभू श्रीरामांची, स्वामी समर्थांची यथेच्छ टवाळी करण्यात आली. ती टवाळी ऐकून गालातल्या गालात हसणारे शरद पवार आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. देशभरातील हिंदूविरोधी शक्तींचे मेरूमणी असलेले राहुल गांधी निवडणुकीच्या काळात डोक्याला भस्म लावून जसे मंदीरात फिरत असतात तसाच पवारांमधला चुनावी हिंदू जागा झालेला आहे.

पुरोगामी मुखवट्याच्या आड पवारांनी हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्थांची टवाळी करण्याचे काम सातत्याने केलेले आहे. कुराणाची भलामण करणाऱ्या पवारांना, त्यांच्या कन्येला हिंदूंच्या श्रद्धांचा विषय आला की टीका करण्याची भलतीच खुमखुमी येते. सुप्रिया सुळे यांनी संकष्टीचे मटण खाऊन फोटो पोस्ट करावेसे वाटतात. पवारांना मंदिराच्या पायऱ्यांशी गेल्यावर मटण खाल्ल्याची आठवण येते. परंतु एखादी मजार, दर्गा असला तर हे दोघेही लोटांगण घालायचे बाकी ठेवतात. पवारांची श्रद्धा कोणावर असावी, त्यांनी काय खावे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. एखादा नेता हिंदूविरोधी मानसिकतेचा असू शकतो.

असदुद्दीन ओवेसी हिंदूविरोधी आहेत. परंतु ते त्यांच्या वैचारिक भूमिकेवर ठाम तरी आहेत. प्रामाणिक तरी आहेत. पवार, आम्ही देवाचे बाप आहोत, म्हणून नसलेल्या मिशा पिळतात, निवडणुका आल्यावर देवाचे दर्शन घ्यायला जाण्याची नौटंकीही करतात. कशाला करायची अशी थेरं? पवारांनी मजारीवरच डोकं रगडत राहावं, मुस्लीम मतांची तजवीज करावी, कारण मुस्लीम मतांमुळेच ते सत्तेवर येतात. ही कबुली त्यांनी अनेकदा दिली आहे. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची गरज काय? गणपती ही बुद्धीची देवता आहे. मागणाऱ्याला तो फक्त सुबुद्धी देऊ शकतो. परंतु देवाचा बाप समजणाऱ्याला तो विघ्नहर्ता तरी काय देणार?

गेली २५ वर्षे शरद पवार महाराष्ट्रात हिंदू विद्वेषाचे विष पेरण्याचे काम करत आहेत. हे केवळ राजकीय फायद्यासाठी केले जात असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. औरंगजेब देशात इस्लामी रियासत स्थापन कऱण्याच्या ईर्शेने झपाटला होता. सत्ता, त्यातून येणारी सुखं हा त्याच्यासाठी दुय्यम भाग होता. शरद पवारांचा एकूण अविर्भावही तसाच असतो. फक्त त्यांच्या हिंदू द्वेषाची प्रेरणा काय हे आजवर तरी उघड झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लीम होते, छत्रपती गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हते केवळ एवढा इतिहास सांगण्यासाठी ज्या संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला, शरद पवार हे त्या ब्रिगेडचे आधारस्तंभ आहेत. अशा संस्थेच्या अधिवेशात शाहू महाराज उपस्थित राहतात.

ऑगस्टमध्ये झालेल्या ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात काही काळापूर्वी बंद पडलेल्या एका साप्ताहिकाचा संपादक मंचावरून ओकाऱ्या करत होता. श्रीराम, स्वामी समर्थ यांच्याविरोधात तोंडाने चिरपत होते. गरळ ओकत होते. राज्यातील बंद पडलेल्या अशा अनेक वैचारिक दुकानांचा एकमेव आशेचा किरण म्हणजे शरद पवार. काँग्रेसचे खासदार झाल्यानंतर शाहूंना छत्रपती म्हणण्याची इच्छा होत नाही. हिंदूंच्या मुळावर येणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षाच्या वळचणीला जाणाऱ्याला छत्रपती म्हणणे त्या गादीचा अपमान आहे. गडकिल्ल्यांवर बांधलेल्या अनधिकृत बांधकामांचा रक्षणकर्ता छत्रपती असून शकत नाही, तो फार फार तर काँग्रेसचा खासदार असू शकतो. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार कऱण्यासाठी त्यांना प्रभू श्रीरामांच्या गोष्टी सांगितल्या. रामायण, महाभारत सांगितले. सभासद बखरीत तसा स्पष्ट उल्लेख आहे. ज्या श्रीरामांनी शिवाजी महाराजांना छत्रपती बनण्याची प्रेरणा दिली, त्यांची बदनामी हे शाहू महाराज मख्खपणे ऐकतात. असा माणूस छत्रपतींच्या गादीवर बसावा यापेक्षा या गादीचे दुर्दैव ते काय?

श्रीरामांची बदनामी शांतपणे ऐकणारे, बदनामी करणाऱ्या पिलावळीचे नेतृत्व करणारे शरद पवार लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला का जात असावेत? हिंदू श्रद्धांमुळे ज्यांच्या पोटात मळमळ सुरू होते, हिंदू समाजाने अशा शक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे. आपल्या श्रद्धा दूषित होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण श्रद्धेची गंगा दूषित कऱण्यासाठी अखंडपणे प्रयत्न सुरू आहेत. इतिहासाची मोडतोड करून ही मंडळी आता अध्यात्माची गंगा दूषित करण्यासाठी पुढे सरसावली आहेत.

हे ही वाचा:

आरएसएसचे कार्य समजण्यासाठी राहुल गांधींना घ्यावे लागतील अनेक जन्म!

उत्तर प्रदेशात मशिदीवर रातोरात उभ्या राहिल्या तीन मिनार !

समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून सहाय्यक महिलेचाच बलात्कार !

सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक

हेच पवार रामकृष्ण हरी… असा गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या कार्यक्रमातही सहभागी होत असतात. त्यांना मार्गदर्शन करत असतात. तिथेही ब्रिगेडी विचारांचे प्रदूषण निर्माण होईल असा प्रयत्न करीत असतात. वारकरी पंथात जातवादाचा, ब्रिगेडी विचारांचा शिरकाव व्हावा, म्हणून पद्धतशीरपणे प्रय़त्न सुरू आहेत. त्यांचे प्रशिक्षण वर्ग होत असतात. महापुरुषांनंतर महाराष्ट्राच्या संतांचेही जातीपातीनुसार त्या त्या समाजात वाटप होईल, ते त्या जातीपुरते राहतील असा कार्यक्रम जोरात सुरू आहे. ज्या ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राची आभा तेजाने तळपते आहे, त्याची माती करण्याचा एक कलमी उपक्रम या मंडळींनी हाती घेतलेला आहे. मग तो महाराष्ट्राचा धगधगता इतिहास असो वा अध्यात्म.

हिंदू समाज इतका बेसावध आहे की राहुल गांधीने डोक्यावर भस्म रगडले, पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले तर यांना भरून येते. सत्तेवर आल्यानंतर फक्त कुटुंबासाठी आणि एकगठ्ठा मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी सत्ता राबवणारे निवडणुकीच्या आधी फक्त पीआरसाठी देवदर्शनाला जातात. त्यांचा आस्थेशी काहीही संबंध नसतो. त्यांची आस्था फक्त राजकारणावर आणि त्यांच्या राजकारणाचे टॉनिक असलेल्या मुस्लीम मतांवर आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाने काही भाबड्या हिंदूंची मतं पदरात पडणार असतील तर ती त्यांना हवीच आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देवाचे बाप बनण्यासाठी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा