भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटला असून समाजकंटकांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) बांगलादेशला स्वातंत्र्य देणाऱ्या शेख मुजीबुरहमान यांचे घर जाळून टाकले आहे. हजारोंच्या संख्येने निदर्शक प्रथम शेख मुजीबुरहमान यांच्या घराजवळ पोहोचले आणि त्यांनी घराची तोडफोड केली. यानंतर बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे समोर आले आहे. ज्या वेळी निदर्शकांनी शेख मुजीबुरहमान यांच्या घराला आग लावली, त्या वेळी त्यांची मुलगी आणि देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऑनलाइन संबोधित करत होत्या.
बांगलादेशमध्ये आंदोलकांनी ढाकाच्या धानमंडी भागातील शेख मुजीबुरहमान यांच्या घरावर हल्ला केला. हल्ला करणारे बुलडोझर घेऊन आले होते. त्यांनी शेख मुजीबुरहमान यांचे घर पेटवून दिले. दरम्यानच्या काळात हजारोंच्या संख्येने अवामी लीगचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक झाली आहे. या हिंसाचाराविरोधात आवामी लीगने ६ फेब्रुवारीला मोठ्या प्रदर्शनाची तयारी केली होती. शेख हसीना यांच्या अवामी लीगने कार्यकर्ते आणि नेत्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. हायवेसह अनेक शहरात जाम करण्याची तयारी केली होती. मात्र, प्रदर्शनाच्या एकदिवस आधी बांग्लादेशमध्ये स्थिती गंभीर बनली आहे.
हसीना शेख यांच्या भाषणावरून निदर्शन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. इन्कलाब मंचाचे संयोजक आणि जातियो नागोरिक समितीचे सदस्य शरीफ उस्मान हादी यांच्यासह इतर व्यक्तींनीही हल्ल्याचा इशारा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. धानमंडी ३२ येथील निवासस्थानाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी निदर्शकांनी घरावर हल्ला केला होता, ज्यामुळे तोडफोड झाली होती आणि काही भाग जाळून टाकण्यात आला होता.
हे ही वाचा:
२७ वर्षांनी भाजपचे सरकार दिल्लीत येणार?
ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
फडणवीस राजकारणातला बिनजोड पैलवान, बाहुबली!
उत्तराखंडमध्ये एका लिव्ह इन रिलेशनशिपची नोंद
शेख मुजीबुरहमान यांच्या घरावर झालेल्या तोडफोडीबाबत अवामी लीगने अंतरिम सरकारवर आरोप केले आहेत. अवामी लीगने बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर राज्य यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. निवेदन जारी करत म्हटले आहे की, जेव्हापासून बेकायदेशीर, असंवैधानिक आणि फॅसिस्ट युनूस सरकारने राज्यात सत्ता काबीज केली आहे. तेव्हापासून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी राज्य यंत्रणा ताब्यात घेतली आहे.







