भारत सरकारने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे करत अफगाणिस्तानला ५ टन अत्यावश्यक औषधांची खेप पाठवली आहे. या मदतीद्वारे भारताने अफगाण जनतेच्या आरोग्य, कल्याण आणि मानवतावादी सहाय्याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. कठीण परिस्थितीतही भारत सातत्याने अफगाणिस्तानच्या जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “भारताने अफगाणिस्तानला ५ टन अत्यावश्यक औषधांची खेप पाठवली आहे. अफगाण जनतेच्या कल्याणासाठी आणि मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या आमच्या अटळ वचनबद्धतेचा हा भाग आहे.”
अफगाणिस्तानातील आरोग्यसेवा मजबूत करणे आणि तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणे हा या मदतीमागील प्रमुख उद्देश आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानला औषधे, अन्नधान्य, लसी आणि इतर मानवतावादी मदत पुरवत आहे. एप्रिल महिन्यात भारताने अफगाणिस्तानच्या क्षयरोग (टीबी) लसीकरण कार्यक्रमाला चालना देण्यासाठी १३ टन बीसीजी (बॅसिलस कॅलमेट-ग्युरिन) लस आणि संबंधित साहित्य पाठवले होते. याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे दिली होती.
याच वर्षी अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पूर आणि भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर भारताने ५ एप्रिल रोजी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण साहित्य (एचएडीआर) पाठवले होते. मार्च महिन्यात भारताने अफगाणिस्तानला २.५ टन आपत्कालीन औषधे, वैद्यकीय साहित्य, किट्स आणि उपकरणे पाठवली होती. काबूलमधील एका रुग्णालयावर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी ही खेप देण्यात आली होती. पाकिस्तानी हल्ल्यात काबूलच्या पुल-ए-चरखी परिसरातील २,००० खाटांचे ‘ओमिद अॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल’ लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर २५० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.
हे ही वाचा:
बंडखोर खासदारांविषयी बोलताना राऊतांची जीभ घसरली
फ्रान्समध्ये आता भारतीय पर्यटकांना यूपीआयद्वारे थेट पेमेंटची सुविधा
ट्रम्प यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष; लेबनॉनवरील इस्रायली हल्ले सुरूच
दहशतवादी कट उधळला; शहजाद भट्टी नेटवर्कशी संबंधित सात जणांना अटक
नोव्हेंबर २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे उद्योग व वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत व्यापार, संपर्क आणि लोकांमधील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली होती. बैठकीनंतर जयशंकर यांनी भारत अफगाण जनतेच्या विकास आणि कल्याणासाठी आपला पाठिंबा कायम ठेवेल, असे स्पष्ट केले होते. दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य आणि प्रादेशिक संपर्क वाढवण्याच्या उपायांवरही चर्चा केली होती.
यापूर्वीही भारताने अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्त भागांना अन्नधान्य आणि मदत साहित्य पाठवले होते. २०२५ मध्ये बल्ख, समनगन आणि बगलान प्रांतांमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर प्रभावित कुटुंबांच्या मदतीसाठी भारताने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले होते.







