तेहरानने सोमवारी कतारमधील अमेरिकेच्या अल-उदईद एअर बेसवर सहा क्षेपणास्त्र डागल्याची माहिती Axios वृत्तसंस्थेने दिली आहे. ही कारवाई इराणच्या “ऑपरेशन बशारत फतह” या प्रतिहल्ल्याचा भाग असल्याचे इराणी राज्य माध्यमांनी जाहीर केले आहे.
इराणने या कारवाईला “अमेरिकेच्या लष्करी आक्रमकतेविरोधातील लढा” असे संबोधले आहे. अमेरिका काही दिवसांपूर्वी इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुउद्योग स्थळांवर ३० हजार पौंड वजनाचे ‘बंकर बस्टर’ बॉम्ब टाकले होते.
अल-उदईद एअर बेसवर थेट हल्ला
अल-उदईद एअर बेस हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ असून, येथे सुमारे १० हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. बेसचे स्थान कतारच्या राजधानी दोहाबाहेर असून, संपूर्ण खाडी भागातील अमेरिकी मोहिमांचे केंद्र आहे.
दोहामध्ये भीतीचे वातावरण
दोहामध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याचे रॉयटर्स आणि एएफपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले. कतारने आपले आकाशमार्ग तात्पुरते बंद केले. दोहा येथील शाळा, विद्यापीठे, कार्यालये – सर्वांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सुरक्षा इशारा आणि तणाव
अमेरिकन व ब्रिटिश दूतावासांनी त्यांच्या नागरिकांना “घरातच राहण्याचा” इशारा दिला. ही परिस्थिती मध्यपूर्वेत भविष्यातील अधिक व्यापक संघर्षाचा संकेत देत आहे.
हे ही वाचा:
एसटीला १०,३२२ कोटींचा संचित तोटा, पण नफ्यात आणणार!
डीएस्कलेटची बोंब ठोका, थोडे रडा, थोडे पॉपकॉर्न खा…
तृणमूल काँग्रेसच्या विजयी रॅलीदरम्यान स्फोट, मुलीचा मृत्यू!
आणीबाणी म्हणजे पत्रकारितेची मुस्कटदाबी
इराणने किती क्षेपणास्त्र डागले?
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सांगितले की, “जितके बॉम्ब अमेरिकेने आमच्यावर टाकले, तितकेच क्षेपणास्त्र आम्हीही वापरले.”
व्हाईट हाऊसमध्ये तयारी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, जॉइंट चीफ्स चेअरमन जनरल डॅन केन यांच्या समवेत परिस्थितीवर नजर ठेवत आहेत.
इराण-रशिया जवळ येण्याचे संकेत
क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही तास आधीच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. हा रशियाचे सहकार्य मिळवण्याचा इराणचा प्रयत्न स्पष्ट झाला.
अमेरिका-इराण संघर्षाची सुरुवात
१३ जूनपासून इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाला. अमेरिका-इतर देश या संघर्षात सामील होत असून, सध्या परिस्थिती पूर्णपणे युद्धजन्य बनत आहे.
इराणकडून अमेरिकेच्या कतारस्थित लष्करी तळावर झालेला हा हल्ला संपूर्ण पश्चिम आशियातील स्थैर्य धोक्यात आणणारा आहे. यामुळे अमेरिका आणि तिचे सहयोगी देश युद्धजन्य उत्तराची तयारी करत असल्याचे संकेत आहेत. यापुढे परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, यावर जागतिक तेलविक्री, सुरक्षा, आणि आंतरराष्ट्रीय राजकारण अवलंबून असेल.







