भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट रचल्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तोयबाचा (LeT) दहशतवादी सैफुल्ला खालिद याला रविवारी पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ठार करण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात खालिद ठार झाल्याची माहिती आहे. खालिद हा तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. २००५ मध्ये बंगळूरूमध्ये झालेला इंडियन सायन्स काँग्रेसवरील (ISC) हल्ला, २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावरील हल्ला, २००८ मध्ये रामपूर येथील CRPF कॅम्पवरील हल्ले हे खालिदच्या मार्गदर्शनाखाली झाले होते.
रविवारी पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रजाउल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्ला खालिद याची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर पुन्हा एकदा दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा चेहर जगासमोर आला आहे. सैफुल्ला खालिदच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक लष्करचे दहशतवादी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. याशिवाय खालिद या दहशतवाद्याचे पार्थिव पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते आणि त्यानंतर लष्करच्या दहशतवाद्यांनी नमाज पठन केले. खालिद याचे शासकीय इतमामात झालेले अंत्यसंस्कार पाहून पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्या दहशतवाद्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून निरोप देण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहावर पाकिस्तानचा ध्वज होता. तर, अनेक लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित असल्याचे समोर आले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे जगभरात पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला होता तर संतापही व्यक्त करण्यात आला होता.
हे ही वाचा :
तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाणने सरकारच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण नाकारले!
“पाकने सुवर्ण मंदिरावर डागली होती क्षेपणास्त्र, पण…” काय म्हणाले लष्कर अधिकारी?
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला; आयसिसशी संबंधित दोघांना अटक
दहशतवादी खालिद हा लष्करच्या नेपाळ मॉड्यूलचा प्रभारी होता. पाकिस्तानमध्ये राहून तो लष्करसाठी भरतीचे काम पाहत होता. ऑपरेशन सिंदूरनंतर, पाक लष्कर आणि आयएसआयने पाकिस्तानमधील महत्त्वाच्या दहशतवाद्यांची सुरक्षा वाढवली असून यात खालिद याचाही समावेश होता. खालिदच्या पूर्वी हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेला अबू कताल देखील पाकिस्तानमध्ये मारला गेला. त्याने काश्मीरमध्ये सैन्यावर अनेक मोठे हल्ले केले होते.
