अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादी संघटना हमासला कठोर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी गाझामधील सर्व ओलिसांना सोडण्यासाठी हमासला शनिवार दुपारपर्यंतची मुदत दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कठोर इशारा देत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गाझामधून सर्व ओलिसांना सोडण्यात यावे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि परिस्थिती खूप वाईट होईल. शिवाय इस्रायल- हमास युद्धविराम संपुष्टात आणण्याचे आवाहनही ते करतील. हमासने इस्रायली बंधकांच्या सुटकेला रोखण्याची धमकी दिल्यानंतर ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे.
सोमवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “जर शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिस परत आले नाहीत, तर ही योग्य वेळ आहे, युद्ध विराम करार रद्द करा आणि नरकाची दारे उघडू द्यात.” ओलिसांच्या सुटकेला रोखण्यात येईल अशी धमकी हमासने दिल्यानंतर या निर्णयाला ट्रम्प यांनी भयानक म्हटले आहे. उर्वरित सर्व बंधकांना सोडले पाहिजे, ते सर्व परत हवे आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे हमास दहशतवादी गटाला प्रत्युत्तर देण्याचे संकेत देत आहेत का? असा सवाल विचारला असता ते म्हणले की, कळेल; हमासलाही कळेल की मला काय म्हणायचे आहे. हे वाईट लोक आहेत आणि त्यांना कळेल की शनिवारी दुपारी १२ वाजता म्हणजे काय आहे आणि मला काय म्हणायचे आहे. पुढे त्यांनी जॉर्डन आणि इजिप्तलाही इशारा दिला. गाझामधून पॅलेस्टिनी निर्वासितांना घेण्यास नकार दिला तर ते जॉर्डन आणि इजिप्तला करत असलेली मदत रोखू शकतात.
हे ही वाचा :
‘राहुल गांधी माफी मागा अन्यथा हिंदू धर्मातून बहिष्कृत करू’
वादानंतर ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा
लग्नाच्या संगीत कार्यक्रमात २३ वर्षीय तरुणी नाचता नाचता कोसळली आणि…
युद्धानंतर १९ जानेवारी रोजी लागू झालेल्या युद्धबंदी अंतर्गत ४२ दिवसांच्या कराराच्या पहिल्या टप्प्यात १६ ओलिस घरी परतले आहेत. पाच थाई ओलिसांनाही सोडण्यात आले. इस्रायलने त्या बदल्यात शेकडो कैदी आणि बंदीवानांना सोडले आहे, ज्यात प्राणघातक हल्ल्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आणि कोणत्याही आरोपाशिवाय अटक केलेल्या इतरांचा समावेश आहे. गाझामध्ये अजूनही ७० हून अधिक बंधक आहेत.