पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्राने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसने नवे नाव दिले आहे. पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना त्यांच्या पक्षाने सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळासाठी नामांकित केले आहे. पक्षाचे बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांनी या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानंतर एका दिवसातच हा निर्णय घेण्यात आला आहे.
तृणमूल पक्षाने एक्सवर लिहिले आहे की, “अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या जागतिक स्तरावरील प्रचारासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना नामांकित केले आहे. ज्या वेळी जगाला दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, अशा वेळी अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश दृढनिश्चय आणि स्पष्टता दोन्ही आणतो. त्यांची उपस्थिती केवळ दहशतवादाविरुद्ध पश्चिम बंगालच्या ठाम भूमिकेचे प्रतिबिंबच नाही तर जागतिक स्तरावर भारताचा सामूहिक आवाज देखील बळकट करेल.”
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा सामना करण्याचा भारताचा संकल्प इतर देशांसमोर मांडण्यासाठी केंद्राने काही महत्त्वाच्या देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासदारांची नावे समोर आली आहेत. तर, सदस्य निवडण्यापूर्वी केंद्राने पक्षाशी सल्लामसलत केली नाही याबद्दल तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. कोणत्या खासदारांना पाठवायचे हे केंद्र सरकार ठरवू शकत नाही. मूळ पक्षाने नाव ठरवायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच म्हटले होते की, परराष्ट्र धोरणाबाबत आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार
शीख गुरूंबद्दलच्या वादग्रस्त क्लिपमुळे ध्रुव राठीने युट्युबवरून व्हिडीओ हटवला
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड
जदयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात युसूफ पठाण यांची निवड करण्यात आली होती. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूरला भेट देणार आहे. तथापि, माजी क्रिकेटपटू-राजकारणी युसूफ पठाण यांनी सांगितले की ते शिष्टमंडळात सामील होण्यास उपलब्ध राहणार नाहीत. यानंतर काही तासांतचं पक्षाने नवे नाव समोर आणले आहे.
