औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, असं वक्तव्य करणाऱ्या मानखुर्द- शिवाजी नगर मतदार संघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावरून वादंग सुरू आहे. त्यांच्यावर चौफेर टीका केली जात असताना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजावेळी देखील त्याचे पडसाद उमटलेले दिसले. मंगळवारी सकाळी सभागृह सुरू होताच सत्ताधारी आमदारांनी अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांना निलंबित करण्याचा आग्रह केला.
सभागृहात बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “ज्या औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून त्यांची हत्या केली, ज्या औरंगजेबने तुळजापूरचे भवानी मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हिंदुंवर जिझिया कर लावण्याचे काम केले, काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त करण्याचे काम केले त्या औरंगजेबाचे कौतुक अबू आझमी करत आहेत. हे कृत्य देशद्रोही आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल तेव्हा तेव्हा औरंगजेबला नष्ट करण्यासाठी छत्रपती महाराज जन्माला येतील. असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी तेव्हा काढले होते आणि आता याचं औरंगजेबचे कौतुक अबू आझमी करत आहेत. त्याच्याबद्दल चांगले उद्गार काढत आहेत. त्यामुळे अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून देशाच्या अस्मितेविरोधात बोलणाऱ्या आझमी यांना विधीमंडळ अधिवेशन सुरू असेपर्यंत निलंबित करण्यात यावं,” अशी आग्रही मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
औरंग्याची अवलाद असलेल्या अबु आजमीवर देशद्रोहाचा खटला चालवा आणि विधीमंडळ अधिवेशन सुरू असेपर्यंत त्याला निलंबित करा अशी मागणी मी आज सभागृहात केली. pic.twitter.com/n5ylpBavOZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 4, 2025
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी मोगल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करताना म्हटले की, “चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती राज्य कारभाराची होती आणि हिंदू व मुस्लिम अशी नव्हती.” यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना या वक्तव्यावरून विधानसभा सुरू होताच सत्ताधारी पक्षाने गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा..
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण
पीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं
छत्तीसगड: प्रार्थना सभांच्या नावाखाली आदिवासींचे धर्मांतर
बांगलादेशचे मोहम्मद युनुस म्हणतात, संघर्ष असूनही भारताशी संबंध मजबूत
मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील अबू आझमींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपल्या बापाला तुरुंगात टाकणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे आजचा हा मुहूर्त साधत औरंग्याची कबर तोडण्याचा निर्णय व्हायला हवा. ज्याने जिझिया कर लादला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, अशा औरंगजेबाचे केवळ मतांसाठी तुष्टीकरण होत असेल तर अशा विचारांचे तुकडे तुकडे करायला हवेत. यासाठी अबू आझमी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली.