दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उघडं पाडण्यासाठी म्हणून आता भारताने कंबर कसली असून ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा गट परदेशात पाठवण्याची तयारी केली आहे. यासाठी सरकारने सात गट तयार करण्याचा निर्णय घेतला असून काही खासदारांवर या गटांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यात काँग्रेस खासदार शशी थरूर यांचेही नाव आहे. शशी थरूर यांचे नाव काँग्रेसने दिलेले नसून केंद्र सरकारनेच त्यांना एका संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवडले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादावर भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांसाठी चार खासदारांची नियुक्ती करण्याची विनंती सरकारने केल्याचे काँग्रेसने शनिवारी सांगितले. प्रत्युत्तरादाखल, पक्षाने आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसेन आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांची या कामासाठी नियुक्ती केली. मात्र, केंद्राच्या शिष्टमंडळात काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे नाव समाविष्ट आहे.
केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांना परदेशात पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या या समित्यांमध्ये काही खासदारांची नावे पाठवण्यास सांगितले होते. काँग्रेसने जाहीर केलेल्या खासदारांच्या यादीत खासदार थरूर यांचे नाव समाविष्ट नव्हते. काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पक्षाने दिलेल्या चार खासदारांची यादी सार्वजनिक केली. या यादीत आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर लगेचच थरूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आणि शिष्टमंडळाचे नेतृत्व दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले.
हे ही वाचा :
पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील दोघांना मुंबईतून अटक
भारत पाक संघर्षात इस्रोच्या उपग्रहांनी काय काय टिपले?
कबूल..कबूल…कबूल…शरीफ म्हणतात, भारताने नूर खान एअरबेस उद्ध्वस्त केला!
परवाना रद्द केल्यानंतर तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीची उच्च न्यायालयात धाव
भाजप खासदार रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, जेडीयूचे खासदार संजय झा, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रवादीच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे प्रत्येकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. यातील चार जण सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आहेत, तर तीन विरोधी गटाचे आहेत. निवेदनानुसार, प्रत्येक शिष्टमंडळात प्रतिष्ठित राजनयिकांचा समावेश असेल.
