राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएस) मुंबई विमानतळावरून दहशतवादी संघटना आयसिसच्या स्लीपर सेलचा भाग असलेल्या दोन फरार आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे आयईडी बनवणे आणि चाचणी करणे या प्रकरणात हे दोघे आरोपी असून तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत होत्या.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी ओळख पटवण्यात आलेल्या आरोपींना शुक्रवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वर इमिग्रेशन ब्युरोने अटक केली. हे दोघेही इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत होते. इंडोनेशियामध्ये ते लपलेले होते. अटक केल्यानंतर त्यांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आणि अटक केली, असे तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे दोन्ही आरोपी दोन वर्षांहून अधिक काळ फरार होते आणि त्यांच्याविरुद्ध मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच एनआयएने दोन्ही आरोपींबद्दल माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले होते.
निवेदनात म्हटले आहे की, हा खटला गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे, तसेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाच्या पुणे स्लीपर सेलच्या आठ इतर सदस्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हिंसाचार आणि दहशतवादाच्या माध्यमातून देशात इस्लामिक राज्य स्थापित करण्याच्या आयसिसच्या अजेंडाला पुढे नेण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारून भारताची शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने त्यांनी दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचला होता, असे त्यात म्हटले आहे.
एनआयएने म्हटले आहे की, इतर अटक आरोपींसह आधीच आरोपपत्र दाखल केलेले हे दोघे जण पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फैयाज शेख यांनी भाड्याने घेतलेल्या घरातून आयईडी तयार करण्यात सहभागी होते. २०२२-२०२३ या कालावधीत, त्यांनी या परिसरात बॉम्ब बनवण्याच्या आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते आणि त्यात भाग घेतला होता, शिवाय त्यांनी बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोटही केला होता, असे त्यात म्हटले आहे. भारतातील आयसिसच्या दहशतवादी योजना उधळून लावण्यासाठी त्यांच्या कारवायांचा सक्रियपणे तपास करणाऱ्या एनआयएने यापूर्वी या प्रकरणातील सर्व १० आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते.
हे ही वाचा :
भारत पाक संघर्षात इस्रोच्या उपग्रहांनी काय काय टिपले?
कबूल..कबूल…कबूल…शरीफ म्हणतात, भारताने नूर खान एअरबेस उद्ध्वस्त केला!
परवाना रद्द केल्यानंतर तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीची उच्च न्यायालयात धाव
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलहा खान यांच्याशिवाय या प्रकरणात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे तपास संस्थेने सांगितले.
