भारतात विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीचा परवाना रद्द करण्यात आल्यानंतर कंपनीने परवाना रद्द करण्याच्या या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले आहे. निर्णयाला आव्हान देताना सेलेबीने म्हटले आहे की, भारत सरकाने अस्पष्ट राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय हा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. या निर्णयामुळे केवळ ३,७९१ नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही तर परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत होईल.
भारत- पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. अशात तुर्कीयेने वारंवार पाकिस्तान समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर भारतात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुर्कीयेच्या वस्तूंवरही लोकांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून पर्यटकांनीही पाठ फिरवली आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबीचा परवाना रद्द केला होता. या निर्णयानंतर सेलेबीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सेलेबी एव्हिएशनने त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला आहे, परंतु कंपनीचा कसा धोका आहे हे स्पष्ट केलेले नाही. कंपनीने असेही म्हटले आहे की त्यांचे बहुतेक नियंत्रक तुर्की वंशाचे नाहीत, जरी त्यांचे भागधारक तुर्कीयेमध्ये नोंदणीकृत आहेत. त्यांनी न्यायालयात सांगितले की, भारत सरकारच्या या निर्णयामुळे ३,७९१ नोकऱ्या आणि गुंतवणूकदारांवर परिणाम होणार आहे. याचबरोबर कंपनीला कोणताही इशारा न देता त्यांनी हा निर्णय जारी केल्याचे कंपनीने न्यायालात म्हटले आहे. या याचिकेवर भारत सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, परंतु सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते.
हे ही वाचा:
नीरज चोप्राने अखेर ९० मीटरचा टप्पा पार केला
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेची धुरा सहपोलिस आयुक्तांच्या खांद्यावर
भारताचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, देशभरातून सेलेबीवर बंदी घालण्याची मागणी होत होती आणि सरकारने राष्ट्रीय हित लक्षात घेऊन हे पाऊल उचलले आहे.
सेलेबी सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, मोपा आणि कन्नूर या नऊ विमानतळांवर भारतीय विमान वाहतुकीच्या ६५ टक्के वाहतुकीचे व्यवस्थापन करत होती. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींकडून सर्व परवानग्या घेतल्या असल्याची माहिती आहे.
