भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शुक्रवार, १६ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये अखेर ९० मीटरचा अडथळा पार केला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९०.२३ मीटरची जबरदस्त फेक करत ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली. यासह तो ९० मीटरच्या पुढे भाला फेकणारा २५वा पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी त्याची सर्वोत्तम फेक ८९.९४ मीटर (स्टॉकहोम डायमंड लीग २०२२) होती.
नीरजने स्पर्धेची सुरुवातच ८८.४४ मीटरच्या जबरदस्त फेकीने केली आणि लवकरच आघाडी घेतली. या फेकीमुळे त्याने टोकियोमध्ये होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. पात्रतेची मर्यादा ८५.५ मीटर होती. पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेता पीटर्स दुसऱ्या स्थानावर होता (८५.६४ मी.), तर केशॉर्न वॉल्कॉट तिसऱ्या स्थानावर (८४.६५ मी.) होता. नीरजची दुसरी फेक फाउल ठरली, पण इतर खेळाडू अजूनही त्याच्या पहिल्या प्रयत्नाची बरोबरी करू शकले नव्हते.
हे ही वाचा:
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेची धुरा सहपोलिस आयुक्तांच्या खांद्यावर
संजय राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील!
तिसऱ्या प्रयत्नात, नीरजने पुन्हा एक उत्तम फेक करत ९० मीटरचा टप्पा पार केला आणि हा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला. फेक करतानाच नीरजला हे लक्ष गाठल्याचे समजले आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.
९० मीटरचा ‘ड्रॅगन’ अखेर पकडला
नीरजने आपल्या करिअरमध्ये अनेक वेळा ९० मीटरचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला होता. पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर, जिथे त्याला रौप्यपदक मिळाले, त्याने आपले प्रशिक्षक बदलले आणि जागतिक विक्रमधारक जान झेलेझ्नी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले. यासोबतच त्याने काही काळ त्रासदायक ठरलेल्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यास यश मिळवले.
दोहा डायमंड लीगपूर्वी नीरज म्हणाला होता की, “मी सातत्याने सराव करत आहे आणि चांगले प्रदर्शन करत आहे, हेच मैदानात उत्तम निकाल मिळवण्याचे मूलभूत कारण आहे. स्पर्धेच्या दिवशी काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही, पण मी नेहमीच माझ्या मागील सर्वोत्तम कामगिरीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.”
नीरज चोप्राचे टॉप ५ थ्रो:
९०.२३ मी – दोहा डायमंड लीग २०२५
८९.९४ मी – स्टॉकहोम डायमंड लीग २०२२
८९.४९ मी – लॉझान डायमंड लीग २०२४
८९.४५ मी – पॅरिस ऑलिंपिक २०२४ (फायनल)
८९.३४ मी – पॅरिस ऑलिंपिक २०२४ (क्वालिफायर)
