पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ अचूकपणे उध्वस्त केले. या दहशतवादी तळांचे नेमके स्थान निश्चित करण्यासाठी आणि एकूणच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उपग्रहांच्या मदतीने सैन्याची मदत केली. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी यापूर्वीही सांगितले होते की, देशातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी १० उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत.
अलिकडच्या भारत- पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने उत्तम कामगिरी केली आणि भारतीय उपग्रहांनी सशस्त्र दलांना मदत केली, त्यांना हवेतून जाणाऱ्या शस्त्रांचा अचूक मार्ग दाखवला, असे इस्रोने शुक्रवारी म्हटले आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत भारतीय उपग्रहांनी कशी मदत केली आणि भारतीय सशस्त्र दलांना धोका कमी करण्यास कसे काम केले हे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, “सर्व उपग्रहांनी अचूकतेने काम केले. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमचे कॅमेरा रिझोल्यूशन ३६ ते ७२ सेमी दरम्यान होते. पण आता आपल्याकडे चंद्रावर ऑन-ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेरा आहे, जो जगातील सर्वात जास्त रिझोल्यूशन कॅमेरा आहे. याशिवाय, आमच्याकडे असे कॅमेरे देखील आहेत जे २६ सेमी रिझोल्यूशनपर्यंत स्पष्ट चित्रे दाखवू शकतात,” असे नारायणन यांनी चेन्नई येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
हे ही वाचा :
कबूल..कबूल…कबूल…शरीफ म्हणतात, भारताने नूर खान एअरबेस उद्ध्वस्त केला!
परवाना रद्द केल्यानंतर तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीची उच्च न्यायालयात धाव
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेची धुरा सहपोलिस आयुक्तांच्या खांद्यावर
यापूर्वी ११ मे रोजी, इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना, नारायणन म्हणाले होते की, भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी किमान १० उपग्रह धोरणात्मक हेतूंसाठी सतत कार्यरत आहेत. देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या ७,००० किमी समुद्रकिनाऱ्यावरील भागांचे निरीक्षण करावे लागेल. आपल्याला संपूर्ण उत्तर भागाचे सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही.
