नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली असताना आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. डीके शिवकुमार यांनी सांगितले की त्यांनी आणि त्यांच्या भावाने काँग्रेसकडून चालवल्या जाणाऱ्या नॅशनल हेराल्डला प्रत्येकी २५ लाख रुपये दिले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांची नावे आल्यानंतर त्यांचे हे विधान आले आहे.
डीके शिवकुमार म्हणाले की, “हो, आम्ही पैसे दान केले आहेत. मी २५ लाख रुपये दिले आणि माझा भाऊ डीके सुरेश याने आणखी २५ लाख रुपये दिले. त्यात काय चूक आहे? आम्ही पक्षाने चालवलेल्या एका वृत्तपत्राला देणगी दिली. हे आमचे कष्टाचे पैसे आहेत. ते चोरीचे पैसे नाहीत. आमची एक ट्रस्ट आहे आणि आम्ही काहीही लपवून न ठेवता उघडपणे दान दिले आहे,” असे शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात त्यांची आणि त्यांच्या भावाची नावे आल्याचे एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. तसेच भविष्यातही आपण असेच करत राहू. ईडीच्या आरोपपत्रात आपले नाव येण्यामागे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला.
डीके सुरेश म्हणाले की, “हे सोनिया गांधींचे ट्रस्ट नाही तर यंग इंडिया ट्रस्ट लिमिटेड (YIL) आहे. आम्ही यंग इंडिया ट्रस्टला देणगी दिली. ही संस्था वैयक्तिक फायद्यासाठी नव्हती आणि तिचा वापर कधीही वैयक्तिक हेतूंसाठी केला गेला नाही,” असे सुरेश पुढे म्हणाले.
गेल्या महिन्यात, ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. तसेच ईडीने दिल्लीतील न्यायालयात सांगितले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना गुन्ह्यातून १४२ कोटी रुपये फायदा झाला आहे.
हे ही वाचा:
“जगाला सांगणार की, दहशतवाद भारताला गप्प बसवू शकत नाही!”
शेअर बाजाराला मिळालेलं ‘गिफ्ट’ : आशीषकुमार चौहान
अमेरिकेबाहेर बनवलेल्या आयफोनसह सर्व स्मार्टफोनवर २५ टक्के कर लादणार
“दहशतवादी आणि नागरिकांमध्ये फरक न करणाऱ्यांना सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची स्थापना १९३८ मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती आणि याला ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ म्हणजेच ‘एजेएल’मार्फत प्रकाशित केले जात होते. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर हे वृत्तपत्र बंद झाले आणि येथूनच हा वाद सुरू झाला. यानंतर, २०१० मध्ये, यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (YIL) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा ३८-३८ टक्के हिस्सा आहे. या प्रकरणात, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये आरोप केला होता की YIL ने AJL च्या २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता फक्त ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतल्या आहेत आणि हा फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा खटला आहे.
