महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड सोमवारी (२२ जून) घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार अधिकृतपणे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात या खासदारांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, नागेश पाटील-अष्टिकर, संजय देशमुख, ओमप्रकाश (ओमराजे) निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दीना पाटील यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून हे सर्व खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत त्यांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यानंतर “ऑपरेशन टायगर” पूर्णपणे यशस्वी झाले असून, यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून लोकसभेतील त्यांचे संख्याबळ लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण नऊ खासदार होते. त्यापैकी सहा खासदारांनी पक्ष सोडल्याने संसदीय स्तरावर ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. विशेष म्हणजे, १७ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला हे सर्व खासदार अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू झाले होते.
बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या घडामोडीचे स्वागत केले. “आज माझ्यासोबत एक नव्हे तर सहा वाघ आहेत. आम्ही यावेळी षटकार मारला आहे,” असे ते म्हणाले. शिवसेनेतील २०२२ मधील बंडाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, पक्षाची मूळ हिंदुत्ववादी विचारधारा आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह वाचवण्यासाठी तेव्हा उठाव करण्यात आला होता. खासदारांचा ताजा प्रवेश हा त्या विचारांना मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतीक असल्याचा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “शिवसेना हे एक कुटुंब आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा असलेले कट्टर शिवसैनिक आज पुन्हा शिवसेना परिवारात दाखल झाले आहेत. चार वर्षांपूर्वी २२ जून २०२२ रोजी आम्ही उठाव केला होता. त्यावेळी ४० आमदार आमच्यासोबत आले होते. आता चौकार नाही तर षटकार मारला आहे. हा दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आहे. आमचा लढा बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे.”
हे ही वाचा:
कतारमधील रास लाफान गॅस प्रकल्पातील स्फोटाबाबत भारताकडून दुःख व्यक्त
भारताच्या संरक्षण शक्तीला मोठे बळ; अमेरिकेकडून ४,००० कोटींच्या सहाय्य पॅकेजला मंजुरी
ब्रिटनला १० वर्षांत मिळणार सातवा पंतप्रधान, स्टार्मर यांचा राजीनामा
नीट पुनर्परीक्षेत ‘मुन्ना भाई’ रॅकेटचा पर्दाफाश
एकनाथ शिंदे यांनी, शिवसेना परिवारात सामील झालेल्या सहाही खासदारांचा योग्य सन्मान केला जाईल आणि त्यांच्या योगदानाकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, या खासदारांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. केंद्र किंवा राज्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असोत, त्यांची कोणत्याही स्तरावर अडवणूक होणार नाही, असा शब्दही शिंदे यांनी यावेळी दिला. या सर्वांची ताकद एकत्र आल्याने शिवसेना आणखी भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना असा विश्वास दिला की, “मी दिलेला शब्द पाळतो, म्हणूनच कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवतात. मुख्यमंत्री असतानाही आणि आजही मी स्वतःला कार्यकर्ता समजूनच काम करतो. येथे कोणी मालक नाही, आपण सर्व सहकारी आहोत. प्रत्येकाचा मान-सन्मान राखत आपण एक कुटुंब म्हणून पुढील वाटचाल करू.”







