१९४७ ला झालेल्या फाळणीनंतर पहिला दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हाच काश्मीरमधील दहशतवाद्यांशी प्रभावीपणे सामना केला गेला असता, तर आज भारताला जो दहशतवादाचा विकृत अनुभव येत आहे, तो आला नसता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील एका सभेत सांगितलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४७ मध्ये पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करताना, पाकिस्तानव्याप्त काश्मीर परत मिळवल्याशिवाय ती थांबवू नये, असा सल्ला दिला होता, परंतु त्या वेळी काँग्रेस सरकारने त्यांचा सल्ला दुर्लक्षित केला.
“१९४७ मध्ये, जेव्हा भारतमातेची तीन तुकड्यांत फाळणी झाली… त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. भारतमातेच्या एका भागावर ‘मुझाहिदीन’च्या नावाखाली पाकिस्तानने जबरदस्तीने ताबा मिळवला. त्याच दिवशी, त्या मुझाहिदीनचा खात्मा करायला हवा होता,” असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी पुढे म्हटलं, “सरदार पटेल यांची इच्छा होती की पीओके परत मिळवल्याशिवाय लष्कराने थांबू नये. पण सरदारसाहेबांचे शब्द ऐकले गेले नाहीत.”
“हे जे मुझाहिदीन रक्तपात करत आहेत, तो गेल्या ७५ वर्षांपासून चालू आहे. जे पहलगाममध्ये घडलं, ते त्याचाच विकृत रूप होतं… भारतीय लष्कराने प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पाकिस्तानने समजून घेतलं आहे की, तो भारताला हरवू शकत नाही,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
हे ही वाचा:
स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला आणि अचानक स्फोट झाला!
१२ वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या चार घुसखोर बांगलादेशींना अटक!
तांबेच बोलले राहुल गांधींबद्दलचं ‘सत्य’…
पंतप्रधानांच्या मते, भारताविरुद्धची दहशतवादी कारवाई ही “खाजगी युद्ध” (proxy war) नाही, तर “पाकिस्तानने आखलेली युद्धनीती” आहे. “दहशतवाद हा प्रॉक्सी वॉर नाही, ती तुमची युद्धनीती आहे. तुम्ही आमच्यावर युद्ध लादत आहात,” असंही त्यांनी सीमापार दहशतवादाचा उल्लेख करताना स्पष्ट केलं.
