बिहारमध्ये सध्या निवडणूकपूर्वीची रणधुमाळी सुरू असून जोरदार प्रचाराचे वारे वाहत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुझफ्फरपूर येथील एका मेगा निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधत खरपूस समाचार घेतला. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भ्रष्टाचाराचे “युवराज” म्हणत खोट्या आश्वासनांचे दुकान चालवल्याचा आरोप केला.
“नामदारा”ने “कामदारा”ला शिवीगाळ केल्याशिवाय अन्न पचत नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “बिहारच्या निवडणूक लढाईत, स्वतःला युवराज समजणारे दोन तरुण आहेत. त्यांनी खोट्या आश्वासनांची दुकाने उघडली आहेत. एक म्हणजे भारतातील सर्वात भ्रष्ट कुटुंबातील युवराज आणि दुसरा म्हणजे बिहारच्या सर्वात भ्रष्ट कुटुंबातील युवराज. हे दोघेही हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जामिनावर बाहेर आहेत,” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की, जे “नामदार” आहेत ते “कामदारा”लाही शिवीगाळ करतील. त्याशिवाय त्यांना त्यांचे अन्न पचत नाही. दलित आणि मागासवर्गीयांना शिवीगाळ करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे हे नामदार मानतात. एकेकाळी चहा विकणारा गरीब, मागास कुटुंबातील व्यक्ती आज या पदावर पोहोचला आहे हे त्यांना सहन होत नाही, असे म्हणत मोदींनी टीकास्त्र डागले.
राजद आणि कॉंग्रेसची ओळख म्हणजे “कट्टा, क्रूरता, कटुता, कुशासन आणि भ्रष्टाचार”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी “कट्टा, क्रूरता, कटुता, कुशासन आणि भ्रष्टाचार” अशा पाच शब्दांत जंगलराज शासनाचे वर्णन केले. “राजद- काँग्रेस हे पाच गोष्टींवरून ओळखले जाऊ शकते. राजद- काँग्रेसने काय केले आहे? मी तुम्हाला या पाच शब्दांबद्दल सांगेन. कट्टा, क्रूरता, कटुता, कुशासन आणि भ्रष्टाचार. जिथे कट्टा असतो, जिथे क्रूरतेचे राज्य असते, तिथे कायदा मोडतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, राजद आणि काँग्रेसच्या राजवटीत विकास निर्माण होण्याची शक्यता नाही. गरिबांचे हक्क लुटले जातात आणि त्यांच्या राजवटीत काही कुटुंबेच भरभराटीला येतात, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी टीका केली.
हे ही वाचा :
ब्राझीलमध्ये ड्रग्ज टोळ्यांविरोधातील कारवाईत १२१ जणांचा मृत्यू
ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार प्रकरणात आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल
अफगाण सीमेजवळ झालेल्या चकमकीत पाक लष्कराच्या कॅप्टनसह सहा सैनिक ठार
पंजाबमधील आप आमदारावर अपहरणाचा गुन्हा; मुलांचीही नावे एफआयआरमध्ये
एनडीए आणि भाजपाचे प्राधान्य म्हणजे बिहारचा विकास सुनिश्चित करणे
पंतप्रधानांनी आगामी बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या अजेंडाचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की, या आघाडीचे उद्दिष्ट बिहारचा अभिमान वाढवणे आणि त्याची गोड भाषा आणि समृद्ध संस्कृती जागतिक स्तरावर वाढवणे आहे. “एनडीए आणि भाजपमध्ये आमचे प्राधान्य बिहारचा अभिमान वाढवणे, बिहारची गोड भाषा आणि समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, बिहारचा विकास सुनिश्चित करणे आहे. राजद आणि काँग्रेस कधीही बिहारचा विकास करू शकत नाहीत. या पक्षांनी बिहारवर दशके राज्य केले, परंतु त्यांनी लोकांना फक्त विश्वासघात आणि खोटी आश्वासने दिली,” असे पंतप्रधान म्हणाले.







