तमिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत असून अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपासून अवघ्या एका पावलावर आहेत. तमिळगा वेत्री कळघम (TVK) प्रमुख विजय यांना अखेर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सरकार स्थापनेसाठी मंजुरी दिली असून उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात मोठा राजकीय धक्का देत १०८ जागा जिंकल्या. द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या दशकांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाला आव्हान देत TVK सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र बहुमतासाठी आवश्यक ११८ आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी विजय यांना आणखी पाठिंब्याची गरज होती. त्यानंतर काँग्रेसने ५ जागांसह विजय यांना पाठिंबा जाहीर केला. पुढे विदुथलाई चिरुथैगल काची (VCK), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) यांनीही समर्थन दिल्याने विजय यांचा आकडा ११८ वर पोहोचला.
हे ही वाचा:
ट्रम्पनी मोदींचे कौतुक केल्याने संजय राऊतांचा थयथयाट
ब्रिटानियाची चौथ्या तिमाहीत ₹६७९ कोटींची कमाई
चंद्रनाथ रथना मारण्यासाठी ओएलएक्सवरच्या गाडीचा नंबर हल्लेखोरांनी केला कॉपी
क्रिकेटनंतर ‘टॅक्स पिच’वरही महेंद्रसिंह धोनी अव्वल
निकालानंतर काही दिवस तमिळनाडूत मोठा राजकीय सस्पेन्स निर्माण झाला होता. राज्यपालांनी सुरुवातीला विजय यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडल्याची चर्चा होती. TVK कार्यकर्त्यांनी चेन्नईत आंदोलनही केले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी राज्यपालांवर उशीर केल्याचा आरोप करत विजय यांनाच प्रथम संधी द्यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, द्रमुक आणि अण्णाद्रमुक एकत्र येण्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले होते. मात्र अखेरीस छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे विजय यांनी बहुमताचा जादुई आकडा गाठला आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
विजय यांच्या शपथविधीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून रोजगार, शिक्षण, उद्योग आणि युवकांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







