दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. राजधानीतील ७० जागांवर मतदान होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असून राजधानी दिल्लीतील सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याचे चित्र तेव्हा स्पष्ट होणार आहे.
दिल्लीत एकूण ७० जागांसाठी मतदान पार पडत आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून याचे चित्र ८ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ६९९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी, शहरात अनेक स्तरांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निमलष्करी दलांच्या २२० कंपन्या, दिल्ली पोलिसांचे ३५,६२६ कर्मचारी आणि १९,००० होमगार्ड तैनात केले आहेत. जवळजवळ ३,००० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत, ज्यामध्ये ड्रोन देखरेखीसारखे विशेष सुरक्षा उपाय आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होईल. मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आणि त्यांचे मौल्यवान मतदान करण्याचे आवाहन करतो. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या शुभेच्छा.”
हे ही वाचा :
मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक
समान नागरी कायद्यासाठी आता गुजरातचा पुढाकार
महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!
अतुल भातखळकरांनी घेतली त्यांच्या १०१ वर्षांच्या आजीची सदिच्छा भेट!
दिल्लीतील निवडणूक प्रामुख्याने तीन बड्या पक्षांमध्ये होत आहे. आप, काँग्रेस, भाजपा अशी तिरंगी लढत असून आपकडून तिसऱ्यांदा सत्ता राखण्याची तयारी आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्यातही सत्ता मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. आपसाठी, प्रचाराचे नेतृत्व अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी केले होते. शहरभर रॅलींच्या माध्यमातून त्यांनी प्रचार राबवला. मद्य धोरण घोटाळ्यात जामिनावर सुटल्यानंतर राजीनामा देणाऱ्या केजरीवालांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या मोहिमेने आक्रमक भूमिका घेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जोर देत आपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने विविध आघाड्यांवर आप आणि भाजपला लक्ष्य केले. त्यातही आपला त्यांनी अधिक लक्ष्य केल्याचे दिसून आले.