इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने गाझा पट्टीची मालकी घ्यावी आणि तिचा विकास करावा अशी आमची इच्छा आहे. अमेरिका युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग गाझा पट्टीवर कब्जा करेल आणि त्याचा विकास करेल. त्यावर मालकी हक्कही राखेल. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की, पॅलेस्टिनी लोकांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन केल्यानंतर युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग असलेली गाझा पट्टी ताब्यात घेईल आणि त्याचा विकास करेल. त्याचे मालकी हक्कही घेईल. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, ट्रम्प यांचा विचार इतिहास बदलू शकतो आणि ट्रम्प गाझासाठी वेगळ्या भविष्याची कल्पना करतात असेही ते म्हणाले. या घोषणेमुळे जगभरात खळबळ उडाली असून यामुळे मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प पुढे म्हणाले की, “आम्ही त्या जागेवरील सर्व धोकादायक न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे नष्ट करू. नष्ट झालेल्या इमारती पुन्हा उभ्या करून असा आर्थिक विकास निर्माण करू ज्यामुळे परिसरातील लोकांना नोकऱ्या आणि घरे उपलब्ध होतील,” असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
गाझा पट्टीमधील सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी सैन्य तैनात करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही जे आवश्यक आहे ते सर्व करू. सैन्याची आवश्यकता असेल तर ते ही करू. आम्ही तो भाग ताब्यात घेऊ. विकसित करू, हजारो नोकऱ्या निर्माण करू आणि त्याचा संपूर्ण मध्य पूर्वेला अभिमान वाटेल, असंही ट्रम्प पुढे म्हणाले. इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले की, ट्रम्प नवीन कल्पनांसह चौकटीबाहेर विचार करत आहेत आणि पारंपारिक विचारसरणीला छेद देण्याची तयारी दाखवत आहेत.
हे ही वाचा :
दिल्लीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक
समान नागरी कायद्यासाठी आता गुजरातचा पुढाकार
महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!
ऑक्टोबर २०२३ पासून गाझामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात युद्ध सुरू होते. सध्या युद्ध विरामाचा करार झाला असून इस्रायली बॉम्ब हल्ल्यांमुळे गाझामधील सर्वच संरचना जवळपास नष्ट झाल्या आहेत. यामुळे या भागातील लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या प्रदेशाची एकूण लोकसंख्या अंदाजे २.१ दशलक्ष आहे.