दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असून मतदान सुरू होण्याच्या काही तास अगोदर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांकडून ५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, त्यांना काही व्यक्ती रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर फ्लाइंग स्क्वॉड टीम (एफएसटी) घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
एफएसटीने गौरव आणि अजित या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघेही दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाशी संलग्न आहेत. त्यांच्याकडून ५ लाख रुपये जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. माहितीनुसार त्यातील एक जण मुख्यमंत्र्यांच्या पीएचा सहाय्यक आहे आणि दुसरा ड्रायव्हर आहे, अशी माहिती दक्षिण- पूर्वचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रवी कुमार सिंह यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग असलेली गाझा पट्टी ताब्यात घेऊन विकास करणार!
दिल्लीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक
समान नागरी कायद्यासाठी आता गुजरातचा पुढाकार
गौरवने म्हटले आहे की, ही रोख रक्कम वैयक्तिक असून ती घर विक्रीशी संबंधित आहे. मी माझे घर विकले आहे आणि दुसरे घर खरेदी केले आहे. ही रोख रक्कम त्याच्याशी संबंधित आहे. तर, गौरवच्या मोबाईल फोनच्या तपासणीत असे दिसून आले की तो आतिशीचा वैयक्तिक सहाय्यक पंकज याच्या संपर्कात होता. त्यांनी दिल्लीतील वेगवेगळ्या वॉर्डची माहिती आणि कोणाला आणि कुठे किती पैसे द्यायचे याबद्दल कोड वर्ड वापरून चर्चा केली, अशी माहिती ‘इंडिया टुडे’ने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. ‘आप’ने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपने रचलेला हा कट असल्याचे म्हटले आहे.