25 C
Mumbai
Monday, November 10, 2025
घरराजकारणराज ठाकरेंचे हातपाय का गळाले?

राज ठाकरेंचे हातपाय का गळाले?

निवडणूक आयोगावर आरोप

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एक प्रभावी राजकारणी म्हणून नेहमी पाहिले जातात. त्यांच्याकडे संवादकला आहे, भाषण कला आहे, त्यांच्याभोवती ठाकरे कुटुंबाचे एक वलय आहे जे कदाचित उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक आहे. म्हणून उद्धव यांच्यासोबत राज ठाकरे जाणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याबद्दल उत्सुकता दाखविली जात आहे. पण अशा परिस्थितीत राज ठाकरे हे एकूणच निवडणूक प्रक्रियेला एवढे का कंटाळले आहेत, असा प्रश्नही मनात येतो. निवडणूक प्रक्रियेत अनेक दोष आहेत हे आताच नाही अनेकवर्षांपासून बोलले जाते, त्याची उदाहरणे समोर येतात पण आता विधान सभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सगळे विरोधी पक्ष एकसुरात सगळे काही बोगसच सुरू असल्याचा आरोप करत आहेत. राज ठाकरेंनीही आता तोच सूर आळवायला सुरुवात केली आहे.

 

मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमधील मनसेच्या मतदान यादी प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत असताना त्यांनी ही निराशा बोलून दाखविली.ते म्हणाले, तुम्ही मतदान करा अथवा नका करु रिझल्ट आधी ठरलेला आहे. विरोधकांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले, तुम्ही शेण खाऊन ठेवलं आहे म्हणून तुम्हाला राग येतोय. ही सत्ता कशी आली, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. कशी सत्ता आणली जात आहे. राजकारण कसं सुरु आहे.

विधानसभेत २३२ आमदार निवडून आलेत, पण महाराष्ट्रात सर्वत्र सन्नाटा होता. कुठे विजयी मिरवणुका नाहीत. जल्लोष नाही. काहीच नाही. जे निवडून आले ते अवाक् झाले होते. देशात कशा प्रकारच्या निवडणुका सुरु आहेत, याबद्दल सर्वांना कळलं. अनेक जण म्हणतात राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, पण ते निवडून येत नाही… निवडणुका अशा होत असतील, तर कसं निवडून येणार असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

राज्यातील जे स्थानिक पक्ष आहेत, त्यांना संपवण्याचं काम सुरु आहे… मॅच फिक्स झालेली आहे… ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे…. असं देखील राज ठाकरे म्हणाले. मतदार याद्यात तुमची गणितं सगळी सेट केली असेल तर आमचा आमदार खासदार कसा निवडून येईल. राज ठाकरे यांचे हे विधान नैराश्य दाखविणारे आहे. तसे पाहिले तर मनसे पक्षाला स्थापन होऊन आज जवळपास १९ वर्षे लोटली आहेत. या १९ वर्षात त्यांना २००९ला १३ आमदार निवडून आणता आले. पण त्यानंतर ती संख्या कमी होत गेली. आता तर त्यांचा एकही आमदार नाही एक खासदारही नाही. हे सगळे इतक्या वर्षात निवडणूक प्रक्रियेमुळे घडले आहे का? पक्षाची धोरणे, पक्षाचा कार्यक्रम याचा काहीच फटका बसला नसेल का?

२०१४मध्ये प्रथम देशात आणि महाराष्ट्रात भाजपाचे सरकार दणदणीत बहुमतासह आले. महाराष्ट्रात तेव्हा शिवसेना हा पक्षही सोबत होता. तेव्हा मनसेचा एकच आमदार निवडून आला. मग याला जबाबदार कोण. २०१९लाही भाजपा शिवसेना युतीलाच जनतेने कौल दिला. तोही खोटा होता का. पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनी उडी मारून विरोधी पक्षात जात मुख्यमंत्रीपद मिळविले. तोच उद्धव ठाकरे यांचा पक्ष आज निवडणुकीत घोळ आहे असे म्हणतो. त्यांच्या सुरात सूर मिसळून राज ठाकरेही निवडणूक प्रक्रियेत काहीतरी काळेबेरे आहे म्हणतात.

हे ही वाचा:

ऑटोमोबाइल निर्यात १६.८५ लाख युनिट्सच्या पलीकडे

लौकीचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य टिकते

टीएमसीकडून बळाचा वापर

जैन मंदिरातील चोरीचा झाला उलघडा

मग ज्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज राज ठाकरे असल्याचा दावा केला जातोय त्या उद्धव ठाकरेंना २०१४मध्ये ६३ आणि २०१९मध्ये ५६ जागा मिळाल्या त्यातही घोळ आहे का? २०२४ला विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश मिळाले म्हणून सगळे रिझल्ट मॅचफिक्स आहेत असे कसे म्हणता येईल. मग हे आरोप २०१४, २०१९ला का झाले नाहीत. तेव्हाही भाजपाने १२२ आणि १०५ जागा जिंकलेल्या आहेत. आता २०१४ला मिळालेल्या जागांमध्ये आणखी १० जागांची भर पडून त्यांना १३२ जागा मिळाल्या आहेत. असे होऊ शकत नाही का?

बरे गेल्या तीन टर्ममधील मतदारांची टक्केवारी पाहिली तर २०१४ला ६३ टक्के, २०१९ला ६१ टक्के आणि २०२४ ला ६६ टक्के मतदान झाले. राज ठाकरे म्हणतात की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर विजयी महायुतीलाही धक्का बसला. त्यामुळे राज्यात जल्लोषही कुणी केला नाही. पण हा काही एखादा मुद्दा पटविण्यासाठीचा निकष म्हणता येणार नाही. क्रिकेटमध्ये पराभूत झाल्यानंतर खेळपट्टी खराब होती, चेंडूच चांगला नव्हता, मैदानच निसरडे होते, असे म्हणणारे काही संघ असतात. आपले खेळाडूच चांगले खेळले नाहीत, हे ते मान्य करत नाहीत. आपली निवड चुकली, आपली रणनीती चाललीच नाही, हे ते मान्य करत नाहीत. तीच मनसेची अवस्था झाली आहे. या सगळ्या राजकारणालाच राज ठाकरे एवढे का कंटाळले आहेत? त्यांची रणनीती यशस्वी होत नाही, याचे खापर दुसऱ्यांवर फोडले जात आहे का? आपली निष्क्रियता लपवण्यासाठी हा मार्ग सगळ्या विरोधकांनी आता शोधून काढला आहे का.

राजकारण करतानाही बेजबाबदार विधाने टाळणे अत्यंत आवश्यक असते. राजकारण करायला हरकत नाही, पण त्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. प्रेम बिऱ्हाडे या तरुणाचा एक व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने त्याच्यावर अन्याय केल्याची चर्चा सुरू झाली. तसे त्या विद्यार्थ्याने आपल्या व्हीडिओत म्हटले की, या कॉलेजने आवश्यक ती कागदपत्रे न दिल्यामुळे आपली नोकरी गेली. मी कंपनीकडे आयकार्ड परत करायला चाललो आहे. आता यासंदर्भात नेमके काय झाले याची काहीतरी शहानिशा करायला हवी की नाही? पण कोणत्याही राजकीय व्यक्तीने त्याबद्दल शहानिशा केली नाही, कोणतीही माहिती घेतली नाही. थेट मॉडर्न कॉलेजवर चिखलफेक करून मोकळे झाले.

तरुण दलित आहे त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला, त्याची जात विचारण्यात आली वगैरे आरोप सुरू झाले. प्रत्यक्षात काय झाले आहे, हे जाणून घ्यायला हवे होते. रोहित पवार, प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी मॉडर्न कॉलेज हे कसे मनुवादी आहे, दलितांवर अजूनही अन्याय सुरू आहे, अशी नेहमीच्या पठडीतली वाक्य वापरत टीका केली. खरे तर या नेत्यांनी त्या कॉलेजशी संपर्क साधून काय घडले आहे, याची खातरजमा तर करायला हवी होती. त्यातून त्या तरुणावर खरोखर अन्याय झालाय की, कॉलेजने कोणते पाऊल उचलले आहे, याची माहिती त्यांना मिळाली असती.

याच कॉलेजचे श्यामकांत देशमुख यांची मुलाखत विविध वाहिन्यांनी घेतली. त्यात ते म्हणतात की, सदर तरुणाने ज्या एव्हीएशन कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला, त्यांनी कॉलेजकडे त्याच्या पाच वर्षांची माहिती मागवली. पण तो तरुण तीन वर्षांसाठीच कॉलेजकडे असल्यामुळे त्यांनी त्याच्या पुढील दोन वर्षांच्या माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन व्हावे यासाठी विचारणा केली. त्याचे बोनाफाइट प्रमाणपत्र त्या कंपनीला पाठवले. असे तीन मेल त्या कंपनीकडून कॉलेजला आले. त्या पद्धतीने त्यांनी त्यांना हवी असलेली माहिती पाठवली. याचा अर्थ असा की, सदर कंपनीने अद्याप त्या तरुणाला नोकरीच दिलेली नाही. त्यामुळे नोकरी गमावण्याचा प्रश्नच नाही. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता कॉलेजकडून झाली की मगच त्याचा विचार होणार असेल. शिवाय, जर त्या तरुणाला नोकरी गमवावी लागली असती तर त्याच्यासाठी कंपनीने कॉलेजकडे मेलही पाठवले नसते. यातील एक मेल ९ ऑक्टोबर आणि दुसरा मेल १७ ऑक्टोबरला आलेला आहे. मुळात हा सगळा पत्रव्यवहार सदर तरुण आणि कॉलेज यांच्यातील नाही. तो कंपनी आणि कॉलेज यांच्यातील आहे. त्याची पूर्तता झाल्यावर ती कंपनी त्या तरुणाला नोकरी द्यायची अथवा नाही हे ठरवू शकते. यात जातीचा कुठे संबंध आलेला नाही. जर रोहित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या मते कॉलेज तथाकथित मनुवादी वगैरे असते तर त्याला तीन वर्षे तिथे शिकता तरी आले असते का, हा विचारही हे नेते करू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. उगाच घडलेले सगळे जातीयवादातून घडले आहे, असा ओरडा करून काय साध्य झाले? त्यातून नेमका कुणाचा फायदा झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा