पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली असून, बाबर आजम यांच्याकडे पुन्हा एकदा कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. सलग अपयशानंतर शान मसूद यांच्याकडून कसोटीचे कर्णधारपद काढून घेण्यात आले असून, बाबरच्या पुनरागमनाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल झाल्याची चर्चा रंगली आहे.
शान मसूद यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्यांच्या नेतृत्वात संघाने १६ कसोटी सामने खेळले, त्यापैकी तब्बल १२ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही पाकिस्तानला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. या अपयशानंतर पीसीबीने नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी सऊद शकील यांना १७वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली असून, त्यांना अंतिम संघात स्थान मिळण्यासाठी फिटनेस चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
या संघात चार युवा खेळाडूंना प्रथमच कसोटी संघात संधी मिळाली आहे. डावखुरा फिरकीपटू अली उस्मान, फलंदाज मुहम्मद अवैस जफर, वेगवान गोलंदाज उबैद शाह आणि यष्टिरक्षक-फलंदाज मुहम्मद गाजी गोरी यांचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा संघ प्रथम वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून, तेथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी २५ ते २९ जुलै, तर दुसरी कसोटी २ ते ६ ऑगस्टदरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवली जाईल.
त्यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, १९ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत लीड्स, लॉर्ड्स आणि बर्मिंगहॅम येथे सामने होतील.
हेही वाचा :
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो उकळणारा गजाआड
क्रिप्टोचं ‘ब्लॅक नेटवर्क’ अमेरिकेसाठी डोकेदुखी
श्रद्धेचा पैसा लुटून उभारली कोट्यवधींची संपत्ती!
पाकिस्तानचा कसोटी संघ :
बाबर आजम (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला फजल, अली उस्मान, अजान अवैस, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), मुहम्मद अवैस जफर, मुहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, शान मसूद आणि उबैद शाह.







