नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. यानंतर आता महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाचे विशेषतः जेमिमा रॉड्रीग्जच्या खेळीचे कौतुक होत आहे. भारतीय दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही जेमिमाच्या खेळीचे कौतुक करत एक इच्छा व्यक्त केली आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, जर रविवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला नमवून विश्वचषकावर नाव कोरले तर ते जेमिमासोबत गाणे गायला आवडेल आणि जेमिमा गिटार वाजवेल, असे त्यांनी म्हटले आहे. “जर भारताने विश्वचषक जिंकला, तर ती आणि मी – जर तिला ते मान्य असेल तर एकत्र गाणे गाऊ. तिच्याकडे तिची गिटार असेल आणि मीही सोबत गाईन,” असे गावस्कर म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात आम्ही खरंच ते केलं होतं. एक बँड वाजवला जात होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटार वाजवत होती आणि मी गायलो. पण जर भारत जिंकला, तर मला ते पुन्हा करायला आवडेल. जर तिला ते करायला आनंद मिळणार असेल, तर त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”
हे ही वाचा :
ऑनलाईन मागवला १.८६ लाखांचा स्मार्टफोन, मिळाला टाइलचा तुकडा
ऑस्ट्रेलियासारख्या महाबळावर मिळवलेला विजय अफलातून!
“कधी रात्रभर रडणारी… आज ऑस्ट्रेलियाला रडवलं! जेमिमाची इनिंग जगभर दणाणली!”
भारताने रचला महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण विक्रम!
गावस्कर यांची “जॅम विथ जेमिमा” ही इच्छा सध्या भारताच्या विश्वचषक प्रवासातील एक नवी कथा बनली असून यासाठी सर्वच उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात, जेमिमाने तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. १३४ चेंडूत तिने नाबाद १२७ धावा केल्या ज्यामुळे भारताला विक्रमी धावांचा पाठलाग यशस्वी करता आला. ३३९ धावांचा पाठलाग करताना, भारताने पाच विकेट आणि नऊ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला, जो महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पाठलाग आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत जेमिमा हिने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १६७ धावांच्या भागीदारीने खेळाचे चित्र पालटवून टाकले. या दोघींच्या अनुभवी आणि स्फोटक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील १५ सामन्यांचा अपराजित प्रवास थांबला आणि रविवारी नवी मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचे स्थान निश्चित झाले.







