आशियाई रिले अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला ४x१०० मीटर रिले संघाने इतिहास रचत सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी त्यांनी यजमान चीनलाच त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून साध्य केली. भारतीय संघाने ४३.८५ सेकंदांची हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
भारतीय संघात श्राबणी नंदा, एस.एस. स्नेहा, सुदेश्ना शिवंकर आणि तमन्ना या धावपटूंचा समावेश होता. अंतिम शर्यतीत चौघींनी अप्रतिम समन्वय, वेग आणि अचूक बॅटन एक्स्चेंजचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. चीनचा संघ ४४.०९ सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर थायलंडने ४४.११ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.
या विजयामुळे भारतीय अॅथलेटिक्सला मोठी उभारी मिळाली असून आशियाई स्तरावर भारतीय महिला धावपटूंची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. स्पर्धेत भारताने केवळ सुवर्णपदकच नव्हे तर मिश्र रिले प्रकारांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि मिश्र ४x१०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवत भारताने एकूण तीन पदकांची कमाई केली.
भारतीय महिला संघाच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर भारतीय संघाचे अभिनंदन करत हा विजय वारंवार पाहत असल्याचे सांगितले. चीनमध्ये जाऊन चीनलाच हरवण्याची ही कामगिरी भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी!
एनसीईआरटीच्या नववीच्या पुस्तकात प्रथमच ‘आणीबाणी’वरील स्वतंत्र धडा!
‘संजय दिना पाटील यांनी ठार केलेले ५ लोक कोण?’
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना समर्पित भारत घडवू
या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हे सुवर्णपदक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढणार असून आगामी स्पर्धांसाठी हा मोठा मानसिक बूस्टर ठरणार आहे. भारतीय अॅथलेटिक्सच्या वाढत्या सामर्थ्याचे हे आणखी एक ठळक उदाहरण मानले जात आहे.







