एकीकडे IPL 2025 पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरु असताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या चाहत्यांसाठी एक मोठी चिंता समोर येत आहे — त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याचा पुढील सामन्यात सहभाग होणार की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.
हेजलवुड आधीच खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. ३ मे रोजी CSK विरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नाही आणि ९ मे रोजी जेव्हा IPL स्थगित झाला, त्याआधीही त्याच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह होते. आता, WTC फायनल जवळ येत असताना, त्याचं भारतात IPL साठी परतणं जवळपास अशक्य मानलं जात आहे.
त्याने या वर्षाच्या सुरुवातीला साइड स्ट्रेन आणि पायाच्या दुखापतीतून सावरत कठोर मेहनत घेतली होती. IPL त्याच्या लय मिळवण्याचा प्लॅन होता. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणानुसार, त्याला आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या WTC फायनलच्या कंडिशनिंग कॅम्पसाठी जपणं गरजेचं मानलं जातं.
हेजलवुडच नव्हे, तर पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल स्टार्क यांचंही IPL मध्ये राहणं साशंक आहे. सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफ बाहेर गेल्यानं कमिन्स आणि हेड हे दोघंही ऑस्ट्रेलियात राहून WTC साठी तयारी करत राहण्याची शक्यता आहे. तर दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणाऱ्या स्टार्कला देश आणि फ्रँचायझी या दोन जबाबदाऱ्यांमध्ये तोल साधावा लागतोय.
याशिवाय, IPL स्थगित झाल्यानंतर केवळ २४ तासांत परदेशी खेळाडू आणि स्टाफ भारतातून बाहेर गेले. त्यांना परत आणण्याची लॉजिस्टिक आव्हानं देखील मोठी आहेत. न्यूझीलंडचे बहुतांश खेळाडू आधीच मायदेशी पोहोचलेत, तर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला २५ मे पर्यंतच्या NOC नंतरचे निर्णय घ्यायचे आहेत.
दरम्यान, RCB ला एक दिलासा आहे. कर्णधार रजत पाटीदार, ज्याला CSK विरुद्ध फील्डिंगदरम्यान बोटाला दुखापत झाली होती, तो दोन सामने खेळू शकला नव्हता. मात्र IPL मधील हा अनपेक्षित ब्रेक त्याच्यासाठी वरदान ठरू शकतो. तो सध्या पुनर्वसनात असून, RCB त्याच्या प्लेऑफ आणि ‘इंडिया-A’ इंग्लंड दौऱ्याच्या तयारीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.
