पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यादरम्यान एका लफड्यावरून हाणामारी सुरू आहे. एक महिला या तंट्याचा केंद्रबिंदू आहे. सोनिया गांधी यांच्यावर भाजपा समर्थकांनी टीका केली. त्यांच्या पूर्वायुष्यावर चर्चा केली तर काँग्रेसवाल्यांना प्रचंड मिरच्या झोंबतात. ही टीका खरी की खोटी याबाबत फार काथ्याकूट न करता, एका महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा राग आळवण्याची सुरुवात होते. नारीशक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाबाबत बोलणारे, एका महिला नेत्याला अपमानित करत असल्याचा युक्तिवाद काँग्रेसवाले करत असतात. तेच काँग्रेसवाले आम आदमी पार्टीला नामोहरम करण्यासाठी एका लफड्याचा वापर करत आहेत. एका महिलेला चव्हाट्यावर लज्जित करताना दिसत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे लोक अक्षरश: एकमेकांचे कपडे उतरवताना दिसतायत. बहुधा सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त इतर महिलांचे चारित्र्यहनन करायला त्यांची हरकत नसावी. पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते काँग्रेस आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी या प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला आहे. चंदीगडमधील सरकारी बंगल्यांचा वापर भलत्याच कारणासाठी होतो आहे, असा त्यांचा दावा आहे. राजस्थानच्या आप नेत्या गायत्री बिश्नोई यांच्याबाबत खैरा यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चंदीगड सेक्टर ३९ मध्ये मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या सरकारी बंगल्याचे हे प्रकरण आहे. मनीष सिसोदिया यांच्याकडे पंजाब सरकारमध्ये कोणतेही पद नाही तरीही ते पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले डॉ. रवजोत सिंह यांच्या कोठी क्रमांक ९६० चा ताबा घेऊन तिथे राहतायत. राजस्थानच्या आप नेत्या गायत्री बिश्नोई या देखील त्याच बंगल्यात राहतायत. पंजाबमधील जनतेच्या कराचा पैसा आप नेत्यांच्या पाहुणचार आणि अय्याशीवर खर्च केला जात असल्याचा आरोप खैरा यांनी केला आहे. गायत्री बिश्नोई यांचा पंजाबशी काहीही संबंध नसताना देशात अनेक ठिकाणी फिरताना त्या पंजाब पोलिसांची सेक्युरीटी घेऊन फिरतात, असाही त्यांचा दावा आहे.



