पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानी हस्तकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर त्याची तीव्रता वाढवण्यात आली. पडघा, बोरीवली येथे एटीएसने सलग दोन दिवस केलेली कारवाई याच मोहीमेचा एक भाग आहे. घाऊकपणे सुरू असलेल्या या अटकसत्रामागे काही विशेष कारणे आहेत का? असा सवाल अनेकांच्या मनात आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे. पाकिस्तानच्या आयएसआयने भारतातील स्लीपर सेल सक्रीय करायला सुरूवात केलेली आहे. अनेक लोक सीमे पलिकडून येणाऱ्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांनी काही तरी केल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आधीच त्यांचे पेकाट मोडलेले बरे असा विचार करून ही कारवाई सुरू झालेली आहे. युक्रेनने रशियाला ऑपरेशन स्पायडर वेबद्वारे दिलेला दणका लक्षात घेता, भारतात फितुरांविरोधात राबवण्यात येणाऱ्या या कारवाईला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे
