गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर २२० मृतदेहांचे डीएनए नमुने यशस्वीरित्या जुळले आहेत. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर शेअर केली आहे.
ऋषिकेश पटेल यांनी पोस्टमध्ये लिहिले, “शुक्रवार सकाळी ११.४५ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहांची ओळख पटवून ती त्यांच्या नातेवाइकांना सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. आतापर्यंत २२० डीएनए नमुने जुळले आहेत आणि २०२ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत.”
या २०२ मृतदेहांमध्ये: १५१ भारतीय नागरिक असून ३४ ब्रिटिश नागरिक आहेत तर ७ पोर्तुगीज नागरिक व १ कॅनडाचे नागरिक आहेत. नऊ भारतीय असे आहेत जे या विमानातून प्रवास करत नव्हते मात्र विमान कोसळले त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
तेलंगणात १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!
उत्तर प्रदेश पोलिसांनी ८ वर्षांत २३४ अट्टल गुन्हेगारांना धाडले यमसदनी
तन-मनासाठी वरदान ठरणारा सूर्यनमस्कार
लवकरच इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल!
या २०२ मृतदेहांपैकी १५ मृतदेह हवाई मार्गे त्यांच्या गावी पोहोचवले गेले. १८७ मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रस्ते मार्गाने पाठवण्यात आले. उर्वरित मृतदेहही लवकरच त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्याकडून कौतुक
गुरुवारी गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी देखील ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत अहमदाबाद पोलिस, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “सर्वांनी पीडितांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत करून माणुसकीचा मोठा आदर्श ठेवला आहे.”
अपघाताची पार्श्वभूमी
एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे विमान १२ जून रोजी अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहावर ते कोसळल्यानंतर विमानात मोठा स्फोट होऊन एक प्रवासी सोडून बाकी सगळे मृत्युमुखी पडले. शिवाय, वसतीगृहातील लोकही या अपघातात सापडले. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू झाला.एकूण २४१ लोकांचा मृत्यू झाला असून, फक्त एक प्रवासी वाचला आहे, जो भारतीय वंशाचा असून ब्रिटिश नागरिक आहे. या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. सरकारकडून होत असलेली जलद ओळख, डीएनए चाचणी, मृतदेह सुपूर्द करण्याची प्रक्रिया आणि सहवेदना व्यक्त करण्याची प्रक्रिया कौतुकास्पद ठरली आहे.
